शनिवारी (8 जून) टी20 विश्वचषकात आणखी एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँड्सचा 4 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला.
दक्षिण आफ्रिकेकडून ओटनील बार्टमन, मार्को जॅन्सन आणि एनरिक नॉर्किया यांची चमकदार गोलंदाजी केली. तर डेव्हिड मिलरनं नाबाद 59 धावांची खेळी करत संघाला कठीण परिस्थितीतून विजय मिळवून दिला. मिलरनं 51 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद खेळी करत पाचव्या विकेटसाठी ट्रिस्टन स्टब्स (33) सोबत 65 धावांची भागीदारी केली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देत विश्वचषकातील आणखी एक अपसेट रोखला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सनं 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 103 धावा केल्या होत्या. मात्र 104 धावांच्या मामूली लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची एकवेळ 12 धावांत 4 विकेट अशी दयनीय अवस्था झाली होती. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. या विश्वचषकातही त्याची पुनरावृत्ती होते का? असं वाटत होतं. मात्र मिलर आणि स्टब्सनं सावध खेळ करत संघाला संकटातून बाहेर काढलं. नेदरलँड्सकडून व्हिव्हियन किंगमा आणि लोगन व्हॅन बीकनं प्रत्येकी 2 तर बास डी लीडेनं 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड संघाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्यांनी 48 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. नंतर सायब्रँड एंजेलब्रेक्ट (40) आणि व्हॅन बीक (23) यांनी सातव्या विकेटसाठी 45 चेंडूंत 54 धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या 105 वर नेली. एंजेलब्रेक्टनं 45 चेंडूंच्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार ठोकला, तर व्हॅन बीकनं 22 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार मारले. विक्रमजीत सिंग (12) आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (10) या चार फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला.
दक्षिण आफ्रिकेकडून बार्टमॅननं 4 षटकांत 11 धावा देऊन 4 बळी घेतले. त्यानं शेवटच्या षटकात केवळ एक धाव खर्च करून तीन बळी घेतले. तर नॉर्कियानं 19 धावांत 2 तर जॅन्सननं 20 धावांत 2 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषकात अफगाणिस्तानची धमाल! एका वर्षात 4 मोठ्या संघांना पाजलंय पाणी
श्रीलंकेचा पराभव होऊनही वानिंदू हसरंगानं रचला इतिहास, लसिथ मलिंगाचा मोठा विक्रम मोडला
टी20 विश्वचषकात पाहायला मिळाला आणखी एक लो स्कोअरिंग सामना! बांगलादेशचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय