आयपीएल 2024 संपल्यानंतर अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. आयपीएल फायनलनंतर पाच दिवसांनी म्हणजेच 1 जूनपासून विश्वचषकाला सुरुवात होईल. याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाबाबत एक अपडेट समोर आलं आहे. या अपडेटनुसार, वर्ल्ड कपच्या टीममध्ये यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसन हा पहिली पसंती असू शकतो. या रेसमध्ये मुख्यतः संजू सॅमसन, रिषभ पंत आणि केएल राहुल सामील आहेत. दरम्यान, ‘ईएसपीएन क्रीक इन्फो’नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तात असं म्हटलं आहे की, भारतीय निवड समिती राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला टी-20 विश्वचषकासाठी पहिली पसंती मानत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर असू शकतो. सध्याच्या हंगामात पंतही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
संजू सॅमसन आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तसेच एकूण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं आतापर्यंत 9 डावात 77.00 ची सरासरी आणि 161.09 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटनं 385 धावा केल्या आहेत. या यादीत केएल राहुल 378 धावांसह पाचव्या तर रिषभ पंत 371 धावांसह सहाव्या स्थानावर आहे. संजू आणि राहुल यांनी प्रत्येकी 9 डाव खेळले आहेत, तर पंतनं 10 डावात फलंदाजी केली आहे. मात्र, या निवडीबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
‘ईएसपीएन क्रीक इन्फो’च्या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे भारतीय संघाचे टॉप-4 खेळाडू असू शकतात. अशा स्थितीत शुबमन गिलला टी-20 विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, या सर्व गोष्टींना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल दरम्यानच टी20 वर्ल्ड कपसाठी रवाना होणार टीम इंडिया, तारीख आली समोर