आगामी महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मधून बांगलादेश क्रिकेट संघ अधिकृतपणे बाहेर पडला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) स्पष्ट केले आहे की, ते आपला संघ सामने खेळण्यासाठी भारतात पाठवणार नाहीत. त्यामुळे बांगलादेशचा या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. बांगलादेश बाहेर पडताच आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सहभागावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अद्याप टी20 वर्ल्ड कपसाठी आपल्या संघाची अधिकृत घोषणा केलेली नाही. आयसीसीच्या नियमानुसार, कोणत्याही संघाने स्पर्धा सुरू होण्याच्या किमान एक महिना आधी आपला स्क्वाड जाहीर करणे बंधनकारक असते. टी20 वर्ल्ड कपचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे, म्हणजेच 7 जानेवारीपर्यंत सर्व संघांची यादी आयसीसीकडे पोहोचणे आवश्यक होते. मात्र ही मुदत उलटून गेली असतानाही पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानकडून बांगलादेशला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात असल्याची चर्चा होती. बांगलादेश जर वर्ल्ड कपमधून बाहेर पडला, तर पाकिस्तानही स्पर्धेचा बहिष्कार करू शकतो, असे संकेत वेळोवेळी दिले गेले. जरी याबाबत उघडपणे अधिकृत वक्तव्य झाले नसले, तरी पाकिस्तानच्या काही हालचालींमुळे हा संशय अधिक बळावला होता. आता बांगलादेश अधिकृतपणे बाहेर गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेमका काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तान संघ लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ज्या दिवशी संघाची घोषणा होईल, त्याच वेळी पाकिस्तानच्या वर्ल्ड कपमधील सहभागाबाबतही संकेत मिळण्याची शक्यता आहे. जर केवळ ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघ जाहीर झाला, तर वर्ल्ड कप न खेळण्याचा विचार असल्याचे मानले जाईल. मात्र जर वर्ल्ड कपसाठीही स्क्वाड जाहीर झाला, तर पाकिस्तान स्पर्धेत सहभागी होणार, हे स्पष्ट होईल.
बांगलादेश बाहेर पडल्यामुळे टी20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट संकेत आहेत. स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे 15 दिवस शिल्लक असल्याने शेड्यूल बदलणे जवळपास अशक्य आहे. बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड संघाला संधी दिली जाणार असून, बांगलादेशचे नियोजित सामने आता स्कॉटलंड खेळेल. मात्र याबाबत आयसीसीकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.






