टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) सुरू व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघ 7 फेब्रुवारीला मुंबईत युएसए (USA) विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला एकमेव सराव (वार्म-अप) सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.
या सराव सामन्यात टीम इंडियाला आपल्या तयारीची चाचपणी करण्याची शेवटची संधी असेल. चला तर मग जाणून घेऊया, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सराव सामना कधी, कुठे खेळवला जाईल आणि तो तुम्ही लाईव्ह कसा पाहू शकता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सराव सामना बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघ नवी मुंबईतील डी.वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येतील. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल, तर एडन मार्करम (Aiden Markam) दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपद भूषवेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सराव सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. भारतीय चाहते या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर पाहू शकतात. याव्यतिरिक्त, तुम्ही जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची 5 सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी खिशात घातली आहे. या मालिकेत भारतीय संघाने अत्यंत शानदार कामगिरी केली आणि सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकून मालिकेवर कब्जा केला होता. चौथ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला, मात्र शेवटचा सामना जिंकून संघाने मालिकेचा शेवट गोड केला.






