आगामी आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेतून बांग्लादेशाने माघार घेतली असून पाकिस्तान क्रिकेटने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भारताची काय भुमिका असणार याकडे लक्ष होते. त्यावर आता भारतीय क्रिकेट संघटनेची (बीसीसीआय) प्रतिक्रिया मिळाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) पाकिस्तानला त्यांच्या निर्णयावर अजून विचार करण्यास सांगितले आहे.
पाकिस्तान क्रिकेटने त्यांच्या सरकारच्या मंजुरीनंतर ते विश्वचषकात खेळणार असून भारताविरुद्धच्या सामन्यावर मात्र त्यांनी बहिष्कार टाकला आहे. यानंतरही भारतीय संघ आयसीसीच्या नियमांचे पालन करणार आहे. यामुळे ते ठरल्याप्रमाणे श्रीलंकेला जाणार असून सामना अधिकाऱ्यांची सामना रद्द करण्याची वाट पाहणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तानच्या निर्णयानंतरही श्रीलंकेला जाणार आहे. संघ आयसीसीच्या सर्व नियमांचे पालन करणार आहे. ज्यामध्ये ठरल्याप्रमाणे सराव आणि पत्रकार परिषदही होणार आहे. त्यांनी म्हटले, “संघ श्रीलंकेला पोहचणार असून आयसीसीने ठरवलेल्या वेळापत्रकाचे पालन करणार आहे. ज्यामध्ये संघ सराव करणार असून पत्रकार परिषदही होणार आहे. तसेच खेळाडू सामन्यासाठी वेळेवर स्टेडियमवरही जाणार आहेत. त्यानंतर सामना अधिकाऱ्यांची सामना रद्द करण्याची वाट पाहणार.”
या बहिष्कारानंतर भारताचाच फायदा आहे. आयसीसीच्या नियामानुसार, वॉकओव्हर तेव्हाच मिळतो जेव्हा कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उपस्थित नसतो. यामुळे भारताविरुद्धच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा आला नाही तर भारताला वॉकओव्हर मिळून दोन अंकही मिळतील.
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहे. त्यामुळे त्यांचा सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार होता. हा सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार होता.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डनेही सरकारच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेतून माघार घेतली. त्यांनी सुरक्षेचे कारण देत भारतातील सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला आयसीसीने नकार दिल्याने त्यांनी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्ताननेही स्पर्धेत सहभागी होण्यास नाकारले होते. आता मात्र त्यांनी स्पर्धा खेळू मात्र भारताविरुद्धचा सामना नाही खेळणार अशी भुमिका घेतली आहे.






