---Advertisement---

IND vs NZ Final:शिवम दुबेचं तीनदा धावबाद होणं हा टीम इंडियासाठी विश्वचषक जिंकण्याचा शुभ संकेत? जुळून आला हा अद्भूत योगायोग!

On: शुक्रवार, मार्च 6, 2026 8:19 PM
---Advertisement---

भारतीय संघाने 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य (सेमीफायनल) सामन्यात इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. या रोमांचक सामन्यात दोन्ही संघांनी 40 षटकांत मिळून एकूण 499 धावा केल्या, ज्यावरून फलंदाजांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 253 धावांचा डोंगर उभा केला होता, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 246 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात भारतीय संघाने आपल्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करून शिवम दुबेला (shivam dube) चौथ्या क्रमांकावर पाठवले होते. दुबेने या संधीचा फायदा घेत 25 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी केली, मात्र तो दुर्दैवाने धावबाद (Run Out) झाला. याचसोबत एक असा योगायोग जुळून आला आहे, जो भारताला विश्वविजेते बनवण्याचा इशारा देत आहे.

2007 मध्ये जेव्हा भारताने एमएस धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला होता, तेव्हा त्या संपूर्ण स्पर्धेत धोनी तीन वेळा धावबाद होऊन तंबूत परतला होता. आता शिवम दुबे आपल्या कारकिर्दीतील दुसरा टी-20 विश्वचषक खेळत आहे आणि या स्पर्धेत तो देखील आतापर्यंत तीन वेळा धावबाद झाला आहे. अशा प्रकारे एकाच टी-20 विश्वचषकात सर्वाधिक वेळा धावबाद होण्याच्या विक्रमात दुबेने धोनीची बरोबरी केली आहे. धोनीच्या बाबतीत घडलेला हाच योगायोग आता दुबेच्या बाबतीत घडल्याने भारत 2026 चा विश्वचषक जिंकणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे, ज्यांना आतापर्यंत विश्वचषकाच्या इतिहासात पराभूत करण्यात भारताला यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत शिवम दुबेवर सर्वांच्या नजरा असतील. दुबेची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी पाहिली तर, त्याने 10 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत 26.33 च्या सरासरीने 158 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुबेने 3 सामन्यांत 59 च्या सरासरीने 118 धावा केल्या आहेत. हा शानदार रेकॉर्ड पाहता फायनलमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---