टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलिया संघ करत आहे. मात्र, या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आधीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढल्या होत्या. या चिंता अजूनही कायम आहेत. या चिंता दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या नसून संपूर्ण जगाला सतावणाऱ्या कोरोना व्हायरसच्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज ऍडम झम्पा आणि यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर आता संपूर्ण संघावर कोरोनाचे सावट पसरले आहे. संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक एँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी शक्यता वर्तवली आहे की, त्यांच्या संघातील अधिक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असू शकते.
एकमेव यष्टीरक्षक असणाऱ्या खेळाडूला कोरोनाची लागण
ऑस्ट्रेलिया संघात मॅथ्यू वेड (Matthew Wade) हा एकमेव यष्टीरक्षक आहे. आता कोरोनाची लागण होणारा तो ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू बनला आहे. त्याच्यापूर्वी बुधवारी (दि. 26 ऑक्टोबर) फिरकीपटू ऍडम झम्पा (Adam Zampa) याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, असे असूनही शुक्रवारी (दि. 28 ऑक्टोबर) रद्द करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) सामन्यात वेड खेळताना दिसणार होता. एँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी सामना रद्द झाल्यानंतर म्हटले की, याची पूर्ण शक्यता आहे की, संघात कोरोनाची आणखी काही प्रकरण समोर येऊ शकतात.
ऑस्ट्रेलियावर कोरोनाचे सावट
ऍडम झम्पाला यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि तो श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. आयर्लंडच्या जॉर्ज डॉकरेल याचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, परंतु तो रविवारी (दि. 23 ऑक्टोबर) श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसला होता. ऑस्ट्रेलियन सरकारने या महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या खेळाडूंना क्वारंटाईनचा नियम काढून टाकला होता. आयसीसीच्या नियमानुसार, कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या खेळाडूला टी20 विश्वचषकात खेळण्यापासून किंवा त्यांच्या संघसहकाऱ्यासोबत सराव करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही.
पावसामुळे रद्द होऊ शकतो ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघातील सामना
सातत्याने पडत असलेला पाऊस हादेखील ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय आहे. या पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघातील सामन्यालाही उशीर झाला आहे. मैदान झाकून ठेवण्यात आले आहे, तर नाणेफेकही झाली नाहीये. आयर्लंड आणि अफगाणिस्तानमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये शुक्रवारी (दि. 28 ऑक्टोबर) होणारा पहिला सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडदेखील झाकून ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे, मैदानदेखील खूपच ओले आहे. कमीत कमी 5 षटकांचा सामना सुरू करण्यासाठीची वेळ मर्यादा स्थानिक वेळेनुसार रात्री 9.46 मिनिटे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता पाकिस्तानी चाहतेच उडवू लागले आपल्या संघाची खिल्ली; म्हणाले…
भुवनेश्वरच्या 42 मधील फक्त 12 चेंडूंवर फलंदाजाने काढल्या धावा, उर्वरित 30 बॉल डॉट टाकत रचला विक्रम