क्रिकेटच्या मैदानावर कधी काय होईल, याचा काही नेम नाही. या खेळात अशा काही घटना घडतात, ज्याचा परिणाम चाहत्यांच्या मनावर खोलवर होतो. असेच काहीसे आता वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड संघात झालेल्या सामन्यादरम्यान घडली. टी20 विश्वचषक 2022चा तिसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड संघात पार पडला. या सामन्याच्या पहिल्या डावादरम्यान जे काही घडलं, त्याने सर्वांच्याच काळजात धस्सं झालं.
या सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला स्कॉटलंड संघ आला होता. स्कॉटलंड (Scotland) संघाच्या डावादरम्यान एक अशी घटना पाहायला मिळाली, जिथे एक लहान मुलगा मैदानावर लावलेल्या लोखंडाच्या रेलिंगवरून खाली मैदानावर कोसळतो.
नेमकं काय घडलं?
तर झालं असं की, सामन्याच्या पहिल्या डावात स्कॉटलंड संघ फलंदाजी करत होता, त्याचदरम्यान एक लहान मुलगा वरच्या स्टँड्सवरून खाली कोसळला. त्याच्या वडिलांनी जोरात धावत धावत मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. मुलगा रेलिंगवर लटकत होता आणि तेव्हाच त्याचे संतुलन बिघडले. त्याचे वडील धावले, पण ते वेळेत मुलापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे मुलगा त्या रेलिंगवरून खाली पडतो.
सुदैवाने दोन्ही स्टँड्समध्ये जास्त अंतर नव्हते. नाहीतर त्या मुलाला दुखापत झाली असती. त्यावेळी त्याच्या वडिलांनी लगेच उडी मारली. मुलगा खाली कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेक लोक त्या मुलासाठी प्रार्थनाही करताना दिसत आहेत.
सामन्याचा आढावा
टी20 विश्वचषक 2022मध्ये सुपर 12 फेरीत स्थान मिळवण्यासाठी तिसरा सामना सोमवारी (दि. 17 ऑक्टोबर) होबार्ट येथे वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड संघात खेळला गेला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कॉटलंड संघाने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 160 धावा चोपल्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाचा डाव 18.3 षटकात 118 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे स्कॉटलंडने हा सामना 42 धावांनी जिंकला. या पराभवामुळे वेस्ट इंडिजचा सुपर 12 फेरीत पोहोचण्याचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. आता आगामी सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागेल. वेस्ट इंडिजचा पुढील सामना 19 ऑक्टोबर रोजी झिम्बाब्वे संघाविरुद्ध होबार्ट येथेच खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गांगुली नव्हेतर ‘या’ या दोघां भारतीयांपैकी एक बनू शकतो आयसीसी चेअरमन; जय शहांकडे दुसरी मोठी जबाबदारी
रझाच्या खेळाने झिम्बाब्वे पुन्हा ‘सिकंदर’! आयर्लंडला नमवत केली विश्वचषकात विजयी सुरुवात






