टी20 वर्ल्ड कप 2026 चा थरार 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान रंगणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे 9 हंगाम पार पडले असून हा 10वा हंगाम ठरणार आहे. यंदा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन सामने खेळवले जाणार असून भारत विरुद्ध यूएसए, पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स आणि वेस्टइंडीज विरुद्ध स्कॉटलंड या लढती चाहत्यांना ‘ट्रिपल धमाका’ देणार आहेत.
डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून टीम इंडिया यंदा मैदानात उतरणार आहे. भारताने जर यावेळी पुन्हा ट्रॉफी जिंकली, तर तीन वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळेल. स्पर्धेतील अनेक सामने भारतात होणार असल्याने मोठे स्कोअर पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अशातच टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठ्या टॉप-5 धावसंख्या कोणत्या आहेत, यावर एक नजर टाकूया.
श्रीलंका 260/6 (टी20 वर्ल्ड कप 2007)
टी20 वर्ल्ड कपचा पहिला हंगाम 2007 मध्ये खेळवला गेला आणि त्याच वर्षी इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर नोंदवला गेला. श्रीलंका विरुद्ध केनिया या सामन्यात श्रीलंकेने 6 विकेट्सच्या मोबदल्यात 260 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात केनियाचा संघ अवघ्या 88 धावांत गारद झाला. श्रीलंकेने हा सामना तब्बल 172 धावांनी जिंकला.
इंग्लंड 230/8 (टी20 वर्ल्ड कप 2016)
2016 च्या वर्ल्ड कपमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात थरारक सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने 229 धावा केल्यानंतर इंग्लंडने 8 विकेट्स गमावत 230 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. हा टी20 वर्ल्ड कप इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा स्कोअर ठरला.
दक्षिण आफ्रिका 229 (टी20 वर्ल्ड कप 2016)
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 229 धावा करत टी20 वर्ल्ड कप इतिहासातील तिसरा सर्वात मोठा स्कोअर नोंदवला.
भारत 218 (टी20 वर्ल्ड कप 2007)
2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताने 218 धावांचा डोंगर उभा केला. हा सामना युवराज सिंगच्या ऐतिहासिक 6 षटकारांसाठी आजही आठवला जातो.
वेस्टइंडीज 218/5 (टी20 वर्ल्ड कप 2024)
2024 च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्टइंडीजने अफगाणिस्तानविरुद्ध 5 विकेट्सवर 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान 114 धावांत आटोपला आणि विंडीजने सामना 104 धावांनी जिंकला.






