आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला येत्या 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा स्पर्धेतील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघातील फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाज या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडताना दिसून येऊ शकतात. दरम्यान कोणते संघ या स्पर्धेत 300 धावांचा पल्ला गाठणार? याबाबत रवी शास्त्री यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. भारतातील खेळपट्ट्या फलंदाजीसाठी अनुकूल असतात. त्यामुळे धावांचा पाऊस पाडला जाऊ शकतो. तसेच धावांचा यशस्वी पाठलाग देखील केला जाऊ शकतो. आयसीसी रिव्यूवर संजना गणेशनसोबत बोलताना रवी शास्त्री यांनी कोणते 2 संघ 300 धावांचा पल्ला गाठू शकतात. याबाबत भाष्य केलं आहे.
रवी शास्त्री यांच्या मते, भारत आणि ऑस्ट्रेलिया असे दोन संघ आहेत जे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 300 धावांचा पल्ला गाठू शकतात. याबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “ भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात असे खेळाडू आहेत जे, 300 धावांचा पल्ला गाठू शकतात. या दोन्ही संघांमध्ये स्फोटक फलंदाज आहेत. मुख्यतः टॉप ऑर्डरचे फलंदाज. जर टॉप ऑर्डरचा कुठलाही फलंदाज 100 धावा करत असेल तर 300 धावांपर्यंत पोहोचता येतं.”
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत 260 धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 2007 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेने केनियाविरुद्ध खेळताना हा पराक्रम केला होता. भारतीय संघाने आतापर्यंत 218 धावांपर्यंत मजल मारली आहे. ही धावसंख्या इंग्लंडविरुद्ध खेळताना उभारली होती. तर ऑस्ट्रेलियाने 201 धावा ही ऑस्ट्रेलियाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वोच धावसंख्या आहे.
यावेळी भारतीय संघात अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवसारखे स्फोटक फलंदाज आहेत, जे पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळू शकतात. भारतीय संघाने आतापर्यंत 297 धावांपर्यंत मजल मारली आहे. हा पराक्रम बांगलादेशविरुद्ध खेळताना केला होता. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 300 धावांचा पल्ला गाठणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.






