वेस्टइंडीज संघाचे क्रिकेटमध्ये एक वेगळेच स्थान आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून हा संघ क्रिकेट खेळत आहे. या संघात आतापर्यंत अनेक महान खेळाडू होऊन गेले, जे आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून आहे. सध्याच्या घडीला देखील या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या उत्कृष्ट खेळीने क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करत असतात. त्यातीलच एक म्हणजे ड्वेन ब्रावो.
ब्रावो हा एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याने विंडीजकडून खेळताना अनेक वेळा उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र येणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही ब्रावोची शेवटची स्पर्धा आहे. यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे विंडीजचा कर्णधार कायरान पोलार्डने सांगितले. त्याचबरोबर पाकिस्तान सोबत झालेली टी-२० मालिका देखील मायदेशातील त्याची शेवटची मालिका आहे, असेही पोलार्ड म्हणाला.
विशेष म्हणजे या आधीही ब्रावोने २०१८ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, नंतर वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डातील सत्ता परिवर्तनानंतर २०१९ साली ब्रावोने निवृत्तीतून माघार घेत पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतला.
ब्रावोला २०१६ च्या टी-२० विश्वचषकानंतर संघातून वगळण्यात आले होते. परंतु, आता तो विंडीज संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. नुकतीच त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ब्रावो आतापर्यंत अनेक टी-२० स्पर्धांमध्ये खेळला असून तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून खेळतो आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलला काही काळ स्थगिती देण्यात आली होती. परंतु १९ सप्टेंबर पासून उर्वरित आयपीएल खेळवले जाणार असून त्यात ब्रावो खेळताना दिसू शकतो.
ब्रावोची आतापर्यंतची टी२० कारकीर्द –
ब्रावोने आतापर्यंत एकूण ४८९ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ६४२९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने गोलंदाजीतही कमाल केली आहे. त्याने एकूण ५३२ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा ब्रावो जगातील एकमेव खेळाडू आहे.
तसेच ब्रावोने अंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एकूण १२२९ धावा केल्या आहेत. ज्यात ४ अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच त्याने एकूण ७६ विकेट्स देखील आपल्या नावे केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–जिगरबाज! भर मैदानात होऊ लागल्या उलट्या, तरीही ‘या’ गोलंदाजाने पूर्ण केलेले षटक
–Video: पंतच्या हट्ट ठरला टीम इंडीयासाठी फायदेशीर, डीआरएससाठी विराटला समजवल्याने मिळाली मोठी विकेट
–बॉक्सिंगमध्ये देशाला मिळवून दिले पदक, आता महिनाभराची सुट्टी घेणार लवलीना