दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत गुरुवारी (४ ऑक्टोबर) बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने मोठा विजय मिळत सुपर १२ फेरीतील पहिल्या गटात दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.
पहिल्या गटात सध्या इंग्लंड पहिले चारही सामने जिंकल्याने ८ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी ६ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा नेटरन रेट अधिक असल्याने त्यांनी गुण सारखे असतानाही दक्षिण आफ्रिकेला मागे टाकलेले आहे. दोन्ही संघांचे सुपर १२ फेरीतील अखेरचे सामने बाकी असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांसाठी हे सामने महत्त्वाचे आहेत.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात सर्वबाद ७३ धावा केल्या होत्या. त्यानंतर ७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने ६.२ षटकातच पूर्ण करत सामना जिंकला.
या सामन्यात बांगलादेशची कामगिरी सुमार राहिली. बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ७४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंचने सलामीला ५८ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान फिंचने तुफीनी खेळ करताना २० चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तसेच वॉर्नरने १८ धावांची खेळी केली.
अखेर मिशेल मार्शने ५ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १६ धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि शोरिफुल इस्लाम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हा निर्णय ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पाने योग्य ठरवत बांगलादेशच्या फलंदाजीला सुरूंग लावला. त्याने ४ षटकांत १९ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर ग्लेन मॅक्सवेलने १ विकेट घेतली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे बांगलादेशला १५ षटकांत सर्वबाद होत ७३ धावाच करता आल्या.
बांगलादेशकडून फलंदाजी करताना मोहम्मद नाईब (१७), कर्णधार महमुद्दुला (१६) आणि शमिम हुसैन (१९) यांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. याव्यतिरिक्त कोणताही फलंदाज १० धावांचा आकडाही गाठू शकला नाही.
बांगलादेशचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विंडीजला पछाडत श्रीलंकेची विजयी सांगता; हेटमायरची एकाकी झुंज अपयशी
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचे १५ शिलेदार घोषित; भारतीय वंशाच्या अष्टपैलूला मिळाली संधी






