दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना पार पडला. दुबईच्या स्टेडियममध्ये झालेला हा सामना पाकिस्तानने ५ विकेट्सने जिंकला आहे. पाकिस्तानचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. तसेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तानचा हा सलग १४ वा विजय आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला विजयासाठी १४८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून असिफ अलीने १९ व्या षटकात ४ षटकारांसह पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानने १९ षटकात ५ विकेट्स गमावत १४८ धावा केल्या.
पाकिस्तानकडून सलामीला उतरलेल्या मोहम्मद रिजवानने या सामन्यात ८ धावांवर विकेट गमावली होती. पण, नंतर कर्णधार बाबर आझम आणि फखर जमानने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव पुढे नेला. दरम्यान, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी करत बऱ्यापैकी सामन्यावर पकड बनवून ठेवली होती. अखेर बाबर आणि फखर यांची जोडी मोहम्मद नबीने तोडली. त्याने फखरला ३० धावांवर बाद केले.
यानंतर राशिद खानने मोहम्मद हाफिजला १० धावांवर माघारी धाडत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याचा कारनामा केला. या विकेटने पाकिस्तानवरील दबाव वाढला होता. पण, बाबरला अनुभवी शोएब मलिकने चांगली साथ दिली आणि विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. दरम्यान, बाबरने अर्धशतकही पूर्ण केले. पण, तो ५१ धावांवर राशिद खानविरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला. पाठोपाठ, मलिकलाही नवीन उल हकने १९ धावांवर बाद करत सामना अफगाणिस्तानच्या बाजूने वळवला होता.
अखेरच्या २ षटकात पाकिस्तानला २४ धावांची गरज होती. यावेळी असिफ अली आणि शादाब खान हे नवे फलंदाज मैदानात होते. पण असिफने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत १९ व्या षटकात करिम जनतविरुद्ध तब्बल ४ षटकार ठोकले आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. असिफने ७ चेंडूत ४ षटकारांसह नाबाद २५ धावा केल्या.
अफगाणिस्तानकडून राशिद खाननेसर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद नबी, मुजीब उर रेहमान आणि नवीन उल हकने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांची फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. अफगाणिस्तानने पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्येच ४ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर, नजीबुल्लाहने २२ धावांचे योगदान दिले. तर, अखेर कर्णधार मोहम्मद नबी आणि गुलबदीन नाईबने महत्त्वपूर्ण खेळी केल्या आणि संघाला सन्मानजनक १४७ धावांपर्यंत पोहचवले. नबीने ३२ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या आणि गुलबदीन नाईबने २५ चेंडूत ३५ धावांची खेळी केली.
पाकिस्तानकडून इमाद वासिमने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, हसन अली आणि शादाब खानने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –