अबुधाबी। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी (१० नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात झाला. अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ५ विकेट्सने विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १६६ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान होते. हे आव्हान न्यूझीलंडने १९ षटकांत ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. अर्धशतकी खेळी करणाऱ्या डॅरिल मिशेलने विजयी चौकारासह न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मार्टिन गप्टीलला ख्रिस वोक्सने पहिल्या षटकात ४ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनलाही वोक्सने तिसऱ्या षटकात ५ धावांवर बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मात्र, यानंतर डेवॉन कॉनवेने डॅरिल मिशेलसह न्यूझीलंडचा डाव सांभाळला.
डॅरिल मिशेल आणि डेवॉन कॉनवे यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांची भागीदारी चांगलीच रंगली होती. त्यामुळे न्यूझीलंडने सामन्यात पुनरागमन केले. पण, अखेर ही जोडी लियाम लिव्हिंगस्टोनने डेवॉन कॉनवेला ४६ धावांवर बाद करत तोडली. कॉनवेला यष्टीरक्षक बटलरने यष्टीचीत केले. तो बाद झाल्यानंतर डॅरिल मिशेलला साथ देण्यासाठी ग्लेन फिलिप्स मैदानात उतरला.
न्यूझीलंडने १५ षटकांत ३ बाद १०७ धावा केल्या. अखेरच्या ३० चेंडूत न्यूझीलंडला ६० धावांची गरज होती. पण, १६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ग्लेन फिलिप्सला २ धावांवर लिव्हिंगस्टोनने बाद केले. त्यामुळे जिमी निशाम मैदानात आला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दरम्यान १७ व्या षटकात सीमारेषेजवळ जॉनी बेअरस्टोने निशामचा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याचा तोल गेल्याने तो चेंडू षटकार ठरला.
यानंतर १८ व्या षटकात मिशेलने षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात आक्रमक खेळण्याच्या नादात निशामने विकेट गमावली. त्याने ११ चेंडूत १ चौकार ३ षटकारासह २७ धावा ठोकल्या. त्याचा झेल इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने घेतला.
अखेरच्या २ षटकात न्यूझीलंडला २० धावांची गरज होती. यावेळी मिशेलने आक्रमक खेळ करत १९ व्या षटकात २ षटकार आणि १ चौकरासह न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. अखेर मिशेल ४७ चेंडूत ७२ धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. मिशेल सँटेनर १ धावेवर नाबाद राहिला.
मोईन अलीचे अर्धशतक
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी इंग्लंड संघ उतरला. इंग्लंडकडून सलामीला जॉस बटलरसह जॉनी बेअरस्टो फलंदाजीसाठी आला. या दोघांनी चांगली सुरुवात केली होती. पण, त्यांना चांगल्या सुरुवातीचा फारसा फायदा घेता आला नाही. पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात म्हणजेच ६ व्या षटकात बेअरस्टोला ऍडम मिल्नेने बाद केले. बेअरस्टोचा १३ धावांवर अप्रतिम झेल न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने घेतला.
त्यानंतर बटलरने डेविड मलानने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, त्य़ांची जोडीही फार वेळ टिकली नाही. बटलरला ९ व्या षटकात इश सोढीने पायचीत केले. बटलरने २४ चेंडूत २९ धावा केल्या. बटलर बाद झाल्यानंतर मलानला साथ देण्यासाठी मोईन अली मैदानात उतरला. इंग्लंडने १० षटकांत २ बाद ६७ धावा केल्या होत्या.
मोईन अली आणि मलानने इंग्लंडचा डाव पुढे नेताना अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने १०० धावांचा टप्पा १४ षटकांत पूर्ण केला. पण १६ व्या षटकात मलानला ४१ धावांवर टीम साऊथीने बाद करत त्यांची जोडी तोडली. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने अलीला साथ दिली. दरम्यान, अलीने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले.
लिव्हिंगस्टोनला अखेरच्या षटकात १७ धावांवर जिमी निशामने बाद केले. अखेर अली ५१ धावांवर आणि इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन ४ धावांवर नाबाद राहिले. त्यांनी इंग्लंडला २० षटकांत ४ बाद १६६ धावांपर्यंत पोहचवले.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी न्यूझीलंडने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. इंग्लंडला मात्र अंतिम ११ जणांच्या संघात बदल करावा लागला आहे. त्यांचा सलामीवीर जेसन रॉय दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी या सामन्यासाठी इंग्लंडने अंतिम ११ जणांमध्ये सॅम बिलिंग्सला संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
इंग्लंड: जोस बटलर (यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, मोईन अली, ओएन मॉर्गन (कर्णधार), सॅम बिलिंग्स, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, मार्क वुड.
न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, केन विलियम्सन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ऍडम मिल्ने, टीम साऊदी, ईश सोढी, ट्रेंट बोल्ट.