झिम्बाब्वे विरूद्ध पाकिस्तानच्या दुसर्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली. हरारे स्पोर्ट्स क्लबवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाहुण्या पाकिस्तानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात पाकिस्तानकडून एका खेळाडूने पदार्पण केले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल १९ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्यानंतर या खेळाडूला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. या खेळाडूचे नाव आहे तबिश खान.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी
तबिश खान हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने २००२ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षे तो सातत्याने चांगली कामगिरी करतो आहे. या कारकिर्दीत त्याच्या नावे एकूण ५९८ विकेट्स आहेत. त्याची ही तपश्चर्या आज अखेर फळाला आली. झिम्बाब्वे विरूद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात त्याला पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली.
तबिश खान पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तिसरा सर्वाधिक वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या ३६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. याआधी पाकिस्तानकडून १९५५ साली मिरान बख्शने ४७ वर्षाच्या वयात पदार्पण केले होते. तर त्यापूर्वी १९५२ साली आमिर इलाहीने ४४ वर्ष वयात पदार्पण केले होते. आता याच पंक्तीत तबिशने स्थान मिळवले आहे. तबिश खानला आजच्या सामन्यात पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक यांनी टेस्ट कॅप दिली. त्यावेळी तबिश खान भावुक झाल्याचे दिसून आले.
झिम्बाब्वे-पाकिस्तान दुसरा कसोटी सामना
दरम्यान, आजपासून झिम्बाब्वे विरूद्ध पाकिस्तानच्या कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्याला सुरुवात झाली. दोन सामन्यांच्या या मालिकेत पाकिस्तानने पहिला सामना जिंकून आघाडी घेतली होती. तो सामना पाकिस्तानने एक डाव आणि ११६ धावांनी जिंकला होता. त्यामुळे झिम्बाब्वेला मालिका वाचवण्यासाठी दुसरा सामना जिंकणे आता क्रमप्राप्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा! मास्क खरेदी करु न शकणाऱ्या गरजूंच्या मदतीसाठी आर अश्विन आला पुढे; दिले हे आश्वासन