ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात उद्या(५ मार्च) भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघात पहिला उपांत्य सामना होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडची कर्णधार हिदर नाईटने म्हटले आहे की भारताची लेगस्पिनर पुनम यादव तसेच भारताच्या फिरकीपटूंचा सामना करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुनमने या विश्वचषकात आत्तापर्यंत सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तिने भारताला उपांत्य सामन्यात पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
उद्या होणाऱ्या उपांत्य सामन्याआधी पुनमच्या गोलंदाजीबद्दल बोलताना नाईट म्हणाली, ‘आम्ही तिचा सामना करण्यासाठी खूप सराव केला आहे. मला वाटते मागील टी२० विश्वचषकात तिच्या विरुद्ध आम्ही चांगले खेळलो होतो आणि हे केवळ आधी आम्ही केलेल्या तयारीमुळे झाले होते.’
याआधी २०१८ ला झालेल्या महिला टी२० विश्वचषकात भारत आणि इंग्लंड संघामध्येच उपांत्य सामना पार पडला होता. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. या सामन्यात पुनमला एकही विकेट घेतला आली नव्हती. तिने ४ षटके गोलंदाजी करताना २९ धावा दिल्या होत्या.
तसेच नाईट म्हणाली, ‘आता आमच्याकडे एली मेडन नाही (सहाय्यक प्रशिक्षक) जो चांगला लेगस्पिन टाकायचा. पण आमच्याकडे चांगले नवीन प्रशिक्षक आहेत जे लेगस्पिन चांगले टाकू शकतात आणि आम्हाला पुनम विरुद्ध काय करायचे आहे, याबद्दल पूर्ण स्पष्टता आहे.’
त्याचबरोबर भारताच्या फिरकीपटूंचा सामना करणे महत्त्वाचे ठरणार असल्याचेही नाईट म्हणाली. ती म्हणाली, ‘पुनम भारतासाठी महत्त्वाची आहे आणि तिच्यामध्ये मागील विश्वचषकापासून खूप सुधारणा झाली आहे. त्यामुळे आम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर आम्हाला तिचा सामना करावाच लागेल. त्याचबरोबर आम्हाला भारताच्या अन्य फिरकीपटूंचाही सामना करावा लागेल. हीच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे.’
भारताकडून या टी२० विश्वचषकात पुनम यादवबरोबरच राधा यादव, शिखा पांडे यांनीही चांगली गोलंदाजी केली आहे. तसेच त्यांना राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा यांची साथ मिळत आहे.
त्याचबरोबर पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभूत झाल्यानंतर इंग्लंडने उर्वरित तीन सामने जिंकले. त्यामुळे नाईटला असा विश्वास आहे की संघ चांगली लयीत आहे जे त्यांच्यासाठी उद्या फायदेशीर ठरेल.
तसेच उद्याच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबद्दल बोलताना नाईट म्हणाली, ‘आमच्यातील अनेक जणांनी पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात खेळ केला आहे. अशा सामन्यात तुम्हाला जलदगतीने खेळावे लागते. तसेच जो परिस्थिती लवकर स्विकारेल आणि छोट्या कालावधीत चांगली कामगिरी करेल, त्याला फायदा होईल.’
त्याचबरोबर इंग्लंड संघाबद्दल विश्वास व्यक्त करताना नाईट म्हणाली, ‘आमच्या संघाबद्दल चांगली गोष्ट म्हणजे आमच्याकडे विविधता आहे. तसेच संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत वेगवेगळ्या क्षमता असलेल्या खेळाडू आहेत. त्यामुळे आम्हाला वाटते की आमच्यासमोर जी परिस्थिती असेल ती परिस्थिती आम्ही स्विकारु शकतो.’
महत्त्वाच्या बातम्या-
–ऐकावे ते नवल! मुंबई इंडियन्सची किंमत ऐकून हादराल
–टी२० सामन्यात हार्दिक पंड्याचे तुफानी शतक; अर्ध्या संघालाही पाठवले तंबूत
–असा कारनामा करणे नक्कीच सोपं नव्हतं, पण १६ वर्षीय शेफाली करुन दाखवलंच!