आयपीएल.. भारतातील प्रत्येक लहान-मोठ्या क्रिकेटपटूचे स्वप्न असणारी लखलखती स्पर्धा. आपण एक दिवस या लीगमध्ये खेळू अशी आशा आता बाळगत असतात. ही स्पर्धा दरवर्षी चार-दोन तरी असे उदयन्मुख क्रिकेटपटू जगाला देत असते, ज्यांच्यामध्ये पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्याची क्षमता असते.
पहिल्या आयपीएलधील रवींद्र जडेजा, युसुफ पठाणपासून ते तेराव्या आयपीएलमधील टी. नटराजन, ऋतुराज गायकवाड यांच्यापर्यंत हा प्रवास आत्तापर्यंत आला आहे. मधल्या काळात संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू देखील याच स्पर्धेने दिले. त्याचप्रमाणे, २०१७ आयपीएलमध्ये देखील एक असा खेळाडू नावारूपाला आला ज्याने चर्चेला तर फार उधाण आणले. मात्र, त्यानंतर त्याच्या नावाचे वलय कमी झाले आणि तो भारतीय संघात आजतागायत प्रवेश करू शकला नाही. हा क्रिकेटपटू म्हणजे महाराष्ट्राचा राहुल त्रिपाठी.
सैनिकी वातावरणात वाढलेला राहुल
राहुलचे वडील अजय कुमार हे सैन्यात कर्नल पदावर कार्यरत होते. सैन्यात असल्यामुळे त्यांची वारंवार बदली होत असत. मूळ उत्तर प्रदेशाचा असलेल्या राहुलचा जन्म झारखंडची राजधानी रांची येथे झाला. पुढे अजय कुमार यांची बदली गंगटोक, लखनऊ, श्रीनगर अशा ठिकाणी होत राहिला. अखेर, ते पुण्यातच स्थायिक झाले. २००१ च्या दरम्यान लखनऊ येथे सुरेश रैना आणि राहुल एकाच हॉस्टेलमध्ये शिकत होते. मात्र, त्याला क्रिकेटची खरी आवड आणि क्रिकेटकडे गंभीरतेने पहायला पुण्याने शिकवले. सप्टेंबर २००३ मध्ये पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन जिमखाना येथे त्याने प्रवेश केला. हेमंत आठल्ये आणि केदार जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या राहुलने अभ्यासावरून कधीही दुर्लक्ष होऊन दिले नाही. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्याची टक्केवारी ही कायम ९८ च्या वरच राहिली. पुढे त्याने गणित या विषयात बीएस्सी पूर्ण केली.
स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पदार्पण
पुण्यातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये राहुलने लवकरच आपली धाक जमवायला सुरुवात केली. सरळ बॅटने खेळत असला तरी त्याची उत्तुंग षटकार मारण्याची क्षमता वादातीत होती. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाज बागवान यांनी देखील त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. याचे फळ म्हणून २०१० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्याला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना बीसीसीआयतर्फे २५ वर्षाखालील सर्वोत्तम क्रिकेटपटूला दिला जाणारा एमए चिदंबरम पुरस्कार २०१४ साली त्याला मिळाला. महाराष्ट्राला २०१४-१५ रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापर्यंत नेण्यात राहुलची महत्त्वाची भूमिका होती.
कमावली आयपीएल संघांमध्ये जागा
राहुलने स्थानिक स्तरावर क्रिकेट खेळताना दोन वेळा सहा चेंडू सहा षटकार मारण्याची किमया केली होती. याच षटकार मारण्याच्या क्षमतेमुळे त्याच्यासाठी आयपीएलचे दरवाजे खुले झाले. २०१७ च्या आयपीएल लिलावासाठी खेळाडूंची नावे निश्चित होणार होती. त्याच्या अगदी शेवटच्या क्षणाला ३५१ खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचे नाव सामील करण्यात आले. फक्त एकट्या राहुलसाठी रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचे सीईओ रघु अय्यर यांनी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर ट्रायल आयोजित केली आणि राहुलने त्या ट्रायलमध्ये दूरदूर षटकार मारत अय्यर आणि इतर प्रशिक्षकांना प्रभावित केले. अगदी अखेरच्या क्षणी राहुलचा समावेश लिलावासाठीच्या अंतिम यादीत झाला आणि पुणे संघानेच त्याच्यावर दहा लक्ष रुपयांची बोली लावत त्याला आपल्या त्यात सामील करून घेतले.
रहाणेसोबत गाजवली आयपीएल
खरंतर रायझिंग पुणे सुपरजायंट आणि गुजरात लायन्स या संघांना राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्स यांना निलंबित केल्यामुळे दोन वर्षासाठी आयपीएल खेळण्याची संधी मिळाली होती. साल २०१६ च्या आयपीएल हंगामात पुण्याच्या संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिलेली. २०१७ सालच्या हंगामात राहुलला भारतीय संघातील त्यावेळचा प्रमुख फलंदाज अजिंक्य रहाणेसोबत सलामीला येण्याची संधी मिळाली. या संधीचे राहुलने अक्षरश सोने केले. त्या हंगामात भल्याभल्या सलामीवीरांना जमली नाही अशी कामगिरी राहुलने करून दाखवली. राहुलने खेळलेल्या १४ सामन्यात १४६.४४ च्या स्ट्राईक रेटने ३९१ धावा केल्या. राहुलच्या या दमदार कामगिरीचा पुणे संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत नेण्यात मोठा वाटा राहिला. दुर्दैवाने संघाला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.
कामगिरीत झाली घसरण
आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे राहुलकडे महाराष्ट्राचे कर्णधारपद देण्यात आले. तिथे त्याची कामगिरी बऱ्यापैकी राहिली. रायझिंग पुणे सुपरजायंटचा आयपीएलमधील प्रवास साल २०१७ मध्ये संपुष्टात आल्याने पुढील वर्षीच्या लिलावासाठी राहुल सज्ज झाला. प्रत्यक्ष लिलावात राजस्थान, किंग्स इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी चुरस रंगली आणि अखेरीस राजस्थानने बाजी मारत ३.४० कोटी रुपये देत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.
राजस्थान रॉयल्स संघ त्याच्यासाठी लाभदायक ठरला नाही. त्याची हक्काची सलामीची जागा त्याला मिळाली नाही आणि मधल्या फळीत फलंदाजी करताना तो १२ सामन्यात अवघ्या २२६ धावा तो काढू शकला. २०१९ सालामध्ये तर आणखीनच निराशाजनक कामगिरी त्याच्याकडून झाली परिणामी राजस्थान रॉयल्सने त्याला करारमुक्त केले. साल २०२० आयपीएल लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने ६० लाख रुपये देत त्याला नव्याने संधी दिली. यावेळी मात्र, २०१७ आयपीएल वेळची काहीशी झलक त्याने जरूर दाखवली. वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने ११ सामन्यांमध्ये २२० धावांचे योगदान दिले. ज्यामध्ये दोन सामने त्याने एकट्याच्या बळावर कोलकात्याच्या पारड्यात टाकले.
आज महाराष्ट्र क्रिकेट संघातील वरिष्ठ खेळाडू असलेला राहुल भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी आजही दावेदार आहे. मात्र, त्यासाठी त्याला आपला खेळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि खासकरून आयपीएलमध्ये आणखी वेगळ्या उंचीवर न्यावा लागेल यात दुमत नाही.