---Advertisement---

“भारतावर दबाव असल्याने त्यांनी धोनीला मेंटर बनवले”; पाकिस्तानी दिग्गज बरळला

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 5:19 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे टी२० विश्वचषकातील सुपर १२ गटातील सामन्यांना २३ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. सध्या ओमान व अबुधाबी येथे स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत. मात्र, जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमींची नजर २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनावर असेल. या सामन्यासाठी सध्या चांगलीच वातावरणनिर्मिती होत असून, दोन्ही बाजूच्या दिग्गजांकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमद यांनी भारत-पाक सामन्याविषयी महत्त्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले अहमद?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना तन्वीर अहमद म्हणाले,
“कागदावर भारताचा संघ सर्वोत्तम आहे. ते जगभरात उत्कृष्ट क्रिकेट खेळतात. मात्र, आपल्याला संघाच्या अलिकडच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवे.”

अहमद म्हणाले,
“विराटवर दबाव होता म्हणून त्याने या विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये या संघातील कोणताही फलंदाज टॉप टेन खेळाडूंमध्ये नव्हता. रवींद्र जडेजा, अश्विन व भुवनेश्वर यांसारखे अनुभवी खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत. त्यामुळे निश्चितच भारतीय संघावर दबाव आहे. या दबावाचा सामना करण्यासाठी भारताने माजी कर्णधार एमएस धोनीला मेंटर म्हणून पाचारण केले.”
या कार्यक्रमात भारताकडून वीरेंद्र सेहवाग व कपिल देव यांनी सहभाग घेतला होता.

पाकिस्तान संघाचे केले कौतुक
अहमद यांनी भारतीय संघावर टीका केल्यानंतर पाकिस्तानी संघाचे कौतुक करताना म्हटले,
“पाकिस्तान मागील अनेक वर्षापासून युएई येथे खेळत असून त्यांना येथील परिस्थितीचा अंदाज आहे. भारत कागदावर मजबूत असला तरी, टी२० क्रिकेटमध्ये एक खेळाडू सामन्याचे रूप बदलू शकतो.”
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान टी२० विश्वचषकात पाच सामने झाले असून ते सर्व सामने भारताने जिंकले आहेत. २४ ऑक्टोबर रोजी होणारा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---