टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळवणाऱ्या फलंदाजांमध्ये भारत आणि जगातील अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. म्हणूनच, जेव्हा सर्वोत्तम 11 खेळाडू निवडण्याचा विचार येतो तेव्हा निर्णय घेणे कठीण असते. विशेषतः जेव्हा भारताचा ऑल-टाइम टी-20 प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा विचार येतो तेव्हा ते आणखी कठीण होते. एमएस धोनीने 2007 मध्ये भारताला पहिला टी-20 विश्वचषक मिळवून दिला, त्यानंतर 2024 मध्ये रोहित शर्माने विजय मिळवला. तथापि, तुम्हाला आश्चर्य वाटेल की यापैकी कोणत्याही दिग्गजांना ऑल-टाइम प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.
होय, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरने त्याचा ऑल-टाइम प्लेइंग इलेव्हन निवडताना अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले. बांगरने स्फोटक टी-20 सलामीवीर रोहित शर्मा, दिग्गज कर्णधार एमएस धोनी आणि घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना वगळले. सर्वोत्तम 11 मधून या तिन्ही दिग्गजांना वगळून, माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
सलामीला विराट कोहलीसोबत शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शुभमन गिलला टी20 वर्ल्ड कप 2026 साठी संघात स्थान मिळालेलं नसतानाही बांगरने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. त्याच्या मते, गिलकडे आधुनिक टी20 क्रिकेटसाठी आवश्यक असलेली तंत्र आणि आक्रमकता आहे.
मधल्या फळीत केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. केएल राहुलला विकेटकीपर-फलंदाज म्हणून नंबर तीनवर स्थान देण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादवला नंबर चारवर ठेवत त्याच्या नावीन्यपूर्ण फटकेबाजीवर भर देण्यात आला आहे, तर युवराज सिंगला नंबर पाचवर ठेवत मोठ्या सामन्यातील त्याची कामगिरी लक्षात घेतली आहे.
ऑलराउंडर म्हणून शिवम दुबे आणि दीपक चाहर यांना संधी देण्यात आली आहे. दुबेची मोठे फटके मारण्याची क्षमता आणि चाहरची स्विंग बॉलिंग व खालच्या फळीत फलंदाजी ही या निवडीमागची कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.
गोलंदाजी विभागात स्पिनची जबाबदारी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्याकडे देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि आशीष नेहराचा समावेश करण्यात आला आहे.
संजय बांगरचा ऑल-टाइम इंडिया टी-20 प्लेइंग इलेव्हन–
विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, शिवम दुबे, दीपक चहर, मोहम्मद शमी, आशिष नेहरा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल.






