टीम इंडियाचे 2024 टी20 विश्वचषकातील साखळी सामने संपले आहेत. साखळी फेरीत भारतीय संघ अपराजित राहिला. भारताच्या गटातील एकमेव कठीण संघ पाकिस्तान होता, ज्याला टीम इंडियानं अत्यंत चुरशीच्या लढतीत 6 धावांनी पराभूत केलं.
भारतीय संघाचे साखळी फेरीतील तीन सामने न्यूयॉर्कच्या मैदानावर झाले. तर चौथा सामना फ्लोरिडात होता, जो पावसामुळे वाहून गेला. या तिनही सामन्यांमध्ये टीम इंडियानं शानदार कामगिरी केली असली तरी, भारतीय फलंदाजांना मात्र आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या तीन सामन्यांमध्ये मिळून एकाही भारतीयाला 100 धावा करता आल्या नाहीत!
न्यूयॉर्कच्या मैदानावर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज रिषभ पंत आहे. त्यानं आतापर्यंत तीन डावांत एकूण 96 धावा केल्या. या दरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 42 धावा होती. त्याच्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा (68) आणि सूर्यकुमार यादव (59) हे दोनच फलंदाज तिन्ही डावांत मिळून 50 धावांचा टप्पा पार करू शकले. दिग्गज फलंदाज विराट कोहली येथे पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यानं तीन सामन्यांत केवळ 5 धावा केल्या आहेत.
2024 टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, एकही भारतीय फलंदाज टॉप-10 मध्ये नाही. या यादीत सध्या अफगाणिस्तानचा रहमानउल्ला गुरबाज 167 धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्याशिवाय या स्पर्धेत फक्त एकालाच दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आलेला आहे. मार्कस स्टॉयनिस (156), ट्रॅव्हिस हेड (148), ॲरॉन जोन्स (141) आणि ब्रँडन मॅकमुलेन (140) हे सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज आहेत.
स्पर्धेतील भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग हे प्रत्येकी 7 विकेट्स घेऊन टीम इंडियाचे सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत. मात्र हे दोघेही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टॉप-5 मध्ये नाही. हार्दिक पांड्या सातव्या तर अर्शदीप सिंग सध्या आठव्या स्थानावर आहे.
स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकी 12 विकेटसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्याशिवाय कोणत्याही गोलंदाजाला १० बळींचा आकडा गाठता आलेला नाही. त्याच्याशिवाय एनरिक नॉर्किया (9), ॲडम झम्पा (9), अल्झारी जोसेफ (8) आणि अकील हुसेन (8) टॉप-5 मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या विजयासह इंग्लंडला मिळालं सुपर 8 चं तिकीट, आतापर्यंत 7 संघ पात्र
बाबरपासून रिजवानपर्यंत, सगळ्यांचे पगार कापणार पीसीबी! पाकिस्तानी खेळाडूंवर बोर्ड नाराज
या ‘तीन’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंची कारकीर्द संपली! यापुढे संघात स्थान मिळणे कठीण