---Advertisement---

भारतीय संघाने येऊ दिली नाही रूटची ‘सत्ता’, मोठ्या विक्रमापासून ठेवले वंचित

On: मंगळवार, फेब्रुवारी 16, 2021 3:26 PM
---Advertisement---

भारताने मंगळवारी (१६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवला. एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसऱ्या डावात १६४ धावाच करता आल्या. या विजयासह भारतीय संघाने इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचा आशिया खंडातील विजयरथ रोखण्याची कामगिरी करून दाखवली.

भारतीय संघाचा चेन्नई कसोटीत विजय

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोहित शर्माने १६१ धावांची खेळी केल्याने भारतीय संघ ३२९ धावांपर्यंत मजल मारू शकला. रविचंद्रन अश्विनने ५ विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीनंतर भारतीय संघाने दुसर्‍या डावात अश्विनच्या शतकामुळे २८६ धावा फलकावर लावल्या. अखेरीस इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे आव्हान देण्यात आले. जे त्यांना पार करण्यात अपयश आले आणि भारताने दणदणीत विजय मिळवला.

भारतीय संघाने रोखला रूटचा विजयरथ

या विजयासह भारतीय संघाने इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचा भारतीय उपखंडातील सलग सहा कसोटी सामने जिंकण्याचा विजयरथ रोखला. यापूर्वी, रूटच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने भारतीय उपखंडात सलग सहा सामने जिंकण्याची किमया केली होती. इंग्लंड संघाने २०१८-१९ च्या श्रीलंका दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका ३-० अशा फरकाने आपल्या नावे केली होती. त्यानंतर, चालू वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेमध्येच झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने यजमान श्रीलंकेचा २-० ने पराभव केला होता. भारताविरुद्धच्या सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील भारतीय संघाला २२७ धावांनी इंग्लंडने नमवले होते.

याबरोबरच इंग्लंडला भारताविरुद्ध मंगळवारी पराभव स्विकारावा लागल्याने ऑस्ट्रेलियाचा आशिया खंडातील सलग ७ विजयांचा विक्रम मोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाने २००२ ते २००४ दरम्यान सलग ७ विजय आशिया खंडात मिळवले होते. आशिया खंडात सर्वात सलग कसोटी विजय मिळणाऱ्या आशिया खंडाबाहेरील देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया या ७ विजयांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर इंग्लंड ६ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताचा ऐतिहासिक विजय

भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचे उट्टे काढले. दुसऱ्या कसोटी इंग्लंडला खेळाच्या तिन्ही आघाड्यावर मात देत विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन केले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अनुषंगाने या विजयाचे भारतीय संघासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुढील दोन पैकी एक सामना जिंकून आणि एक सामना अनिर्णित राखला तरी भारतीय चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात सहभागी होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या –

‘कॅप्टन’ विराटची कमाल! भारताच्या सर्वात मोठ्या ६ विजयांपैकी ५ विजय कोहलीच्या नेतृत्वातील, वाचा सविस्तर

पदार्पणात बळींचा पंचक, अखेर ४२ वर्षांनंतर अक्षरने संपवली ही प्रतिक्षा; ठरला दुसराच डावखुरा स्पिनर

उडा दे गिल्ली..! डॅनियल लॉरेन्सनंतर मोईन अलीची शिकार, पाहा कशी उडवली रिषभ पंतने दांडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---