भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा धोका असताना भारतीय संघ या दौऱ्यावर जात असून, हा धोका लक्षात घेऊन मालिकेचे वेळापत्रक बदलण्यात आले. कसोटी आणि वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार्या भारतीय संघाला आता पुढील दीड महिना कडक निर्बंध असलेल्या बायो-बबलमध्ये (Bio Bubble) वेळ घालवावा लागणार आहे. भारतीय संघाला पूर्वनिर्धारित वेळापत्रकात कोणत्याही प्रकारच्या क्वारंटाईनमध्ये राहायचे नव्हते. परंतु, बदललेल्या परिस्थितीत आता भारत सोडण्यापूर्वी आणि दक्षिण आफ्रिकेतील शेवटच्या सामन्यापर्यंत सुमारे ४३ दिवस बबलमध्ये राहावे लागेल. भारतीय संघ (Team India) १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा हा संपूर्ण दौरा क्वारंटाइनपासून बायो-बबलपर्यंत जाईल. भारतीय संघ १२ डिसेंबरच्या संध्याकाळी मुंबईत एकत्र येईल. त्यांना, तेथून पुढील तीन दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले जाईल. यानंतर १६ डिसेंबरला सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. तिथेही संघ सुरुवातीला क्वारंटाईनमध्ये असेल आणि नंतर बायो-बबलमध्येच सराव करेल. २६ डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होईल. कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ११ ते १५ जानेवारी २०२२ दरम्यान खेळवला जाईल आणि तोपर्यंत सर्व खेळाडू बायो-बबलमध्येच राहतील.
कसोटी मालिकेनंतर, भारताला तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळायची आहे. ज्यातील पहिला सामना १९ जानेवारीला खेळवला जाईल. तर शेवटचा सामना २३ जानेवारीला खेळवला जाईल. अशा परिस्थितीत, कसोटी संघातील अनेक सदस्य, जे वनडे मालिकेचा देखील भाग असतील, त्यांना आणखी काही दिवस बायो-बबलमध्ये घालवावे लागणार आहेत. अशाप्रकारे, भारतीय संघ १२ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत सुमारे ४३ दिवस कठोर क्वारंटाईन आणि बायो-बबलमध्ये असेल. या कालावधीत एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाने गेल्या दीड वर्षांत बराच काळ क्वारंटाईन आणि बायो-बबलमध्ये घालवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“२०१९ विश्वचषकातील त्या निर्णयाशी मी सहमत नव्हतो”; रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट