भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना ८ डिसेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला १२ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाला दुहेरी झटका बसला आहे. भारतीय संघाने षटकांची गती कमी राखल्याचे आढळल्याने आयसीसीच्या नियमानुसार संघाला दंड ठोठावण्यात आला आहे.
खेळाडूंनाही ठोठावण्यात आला दंड
तिसर्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत असताना भारतीय गोलंदाजाने अपेक्षित षटकांची गती कायम राखली नाही. त्यामुळे संघाकडून सामन्याच्या मानधनातील २०% रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल. आयसीसीच्या एलिट पॅनेलचे सदस्य असलेले तिसऱ्या सामन्याचे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी भारतीय संघाला या प्रकरणात दोषी ठरविले. आयसीसीने दिलेल्या दंडात कर्णधार विराट कोहलीच नव्हे तर संपूर्ण संघातील खेळाडूंना दंड म्हणून त्यांच्या सामन्याच्या मानधनातून २०% रक्कम कापून घेण्यात येणार आहे.
भारतीय संघाला आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार दोषी ठरविण्यात आले. या कलमात संघांनी षटकांची गती कमी राखल्यास त्यांना दंड ठोठावण्याचा अधिकार सामनाधिकाऱ्यांना असल्याचे नमूद केले आहे. याच नियमानुसार भारतीय संघाला काल दंड ठोठावला गेला. सामन्यातील पंच रॉड टकर, जेरॉर्ड एबॉड, तिसरे पंच पॉल विल्सन आणि चौथे पंच सॅम नोगाजस्की यांनी भारतीय संघाला षटकांच्या धीम्या गतीसाठी जबाबदार धरले होते. भारतीय कर्णधाराने या निर्णयाविरोधात अपील न केल्याने सामनाधिकाऱ्यांनी कुठल्याही औपचारिक सुनावणीशिवाय दंड ठोठावला. मात्र या दौऱ्यात दुसर्यांदा भारतीय संघाला षटकांच्या धीम्या गतीसाठी दंड आकारण्यात आला.
मालिका २-१ अशा फरकाने जिंकली
भारतीय संघाला तिसर्या टी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारताने यापूर्वीच मालिका आपल्या नावे केली होती. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाकडून दमदार कामगिरीचे प्रदर्शन करणार्या हार्दिक पंड्याला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मर्यादित षटकांच्या मालिका संपल्यानंतर आता भारतीय संघ १७ डिसेंबरपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल.
संबंधित बातम्या:
– बिग ब्रेकिंग! भारताचा दिग्गज खेळाडू पार्थिव पटेल याची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
– एकाच सामन्यात दोन धक्के! आयसीसीने टीम इंडियावर ठोठावला मोठा दंड
– इथेच माशी शिंकली! तिसऱ्या टी२०त भारताला मिळालेल्या पराभवाची ५ कारणे