दुखापतींमुळे भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. संघ ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या (WTC) महत्त्वपूर्ण सामन्यांच्या तयारीत व्यस्त असतानाच, अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतींमुळे संघाबाहेर आहेत. जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्या यांसारखे महत्त्वाचे खेळाडू सध्या दुखापतीतून सावरत आहेत. यामुळे कर्णधार शुमबन गिल आणि संघ व्यवस्थापनासमोर एक संतुलित संघ तयार करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सर्वात मोठा फटका वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे बसला आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. याच दुखापतीमुळे त्याला यापूर्वी लॉर्ड्सवर झालेला अंतिम एकदिवसीय सामना खेळता आला नव्हता. बीसीसीआयने बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याची पुष्टी केली असून, त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीची निवड करण्यात आली आहे.
अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरलाही तंदुरुस्तीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कार्डिफ येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. फलंदाजी करताना अस्वस्थता जाणवल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर, बीसीसीआयने स्पष्ट केले की तो श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसेल.
तरुण अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी देखील श्रीलंका दौऱ्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या डाव्या पायाच्या ‘क्वाड्रिसेप्स’ स्नायूला दुखापत झाली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ही दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र, चेन्नईतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याची दुखापत अधिक बळावली.
वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला यापूर्वी गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक आणि आयपीएल 2026 ला मुकावे लागले होते. आयर्लंड दौऱ्यादरम्यान त्याने पुनरागमन केले होते, परंतु ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. परिणामी, त्याचे पुनरागमन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.
स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीलाही सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयपीएलदरम्यान त्याच्या डाव्या पायाला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले होते, ज्यातून तो सावरला होता; मात्र, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान त्यालाही हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली.
दुसरीकडे, स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएल 2026 पासून संघाबाहेर आहे. या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी त्याने 14 पैकी केवळ 10 सामने खेळले. पाठीच्या दुखण्यामुळे आणि त्यानंतर क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही आणि सध्या त्याच्यावर पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे.
दुखापतींच्या या मालिकेचा भारतीय संघाच्या नियोजनावर परिणाम होऊ लागला आहे. नजीकच्या काळात भारताला श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या तगड्या संघांविरुद्ध महत्त्वपूर्ण मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे, खेळाडूंना तंदुरुस्त ठेवणे आणि बेंच स्ट्रेंथ मजबूत राखून सातत्यपूर्ण कामगिरी करणे हे संघ व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.






