न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी शिवम दुबेने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुबेने अतिशय आक्रमक पवित्रा घेत अवघ्या 23 चेंडूंमध्ये 65 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 3 चौकार आणि 7 उत्तुंग षटकार ठोकले.
शिवम दुबेने भारताकडून टी20 फॉरमॅटमध्ये तिसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. पन्नास धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याने केवळ 15 चेंडू घेतले. याचसोबत, या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वात जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने 282 च्या स्ट्राईक रेटने खेळत मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातला. इतकेच नाही तर शिवमने ईश सोढीच्या एकाच षटकात 29 धावा कुटल्या.






