भारतीय क्रिकेट संघाला येत्या ४ मार्चपासून घरच्या मैदानांवर श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. परंतु ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत (ICC Updated Test Team Ranking) भारतीय संघाला फायदा झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात भारतीय संघाने एकही कसोटी सामना खेळलेला नाही, तरीही संघ टॉप-२ मध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने जागतिक कसोटी चँपियनशीपच्या विजेत्या न्यूझीलंड संघाचा विजय टाळल्यामुळे भारतीय संघाचा हा लाभ झाला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
तर १७ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका (NZ vs SA) यांच्यात ख्राईस्टचर्चच्या मैदानावर २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने १ डाव आणि २७६ धावांनी जिंकला होता. तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने १९८ धावांनी जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. याच निकालामुळे भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर (Indian Team In Top-2) पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक ११९ गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे.
हेही वाचा- मुंबईच्या ‘या’ खेळाडूला करायचीय तब्बल ७२ तास फलंदाज, वर्ल्डरेकॉर्ड करण्याचा आहे मानस
यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कसोटी मालिकेत २-१ ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतर भारतीय संघ आयसीसीच्या संघांच्या कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला होता. परंतु भारताचा संघ त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघापेक्षा फक्त एका गुणाने मागे होता. न्यूझीलंडच्या खात्यात ११७ गुण होते. तर भारतीय संघ ११६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होता.
मात्र आता दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मालिका विजयापासून रोखले असल्याने भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत खात्यात एका गुणाची नोंद केली होती. परंतु दुसरा सामना गमावल्यानंतर त्यांच्या खात्यातील २ गुण कापले गेले आहेत.
याचमुळे सध्या न्यूझीलंडच्या खात्यात भारताइतके ११६ गुण आहेत. परंतु भारतीय संघाचे रेटिंग पॉईंट्स न्यूझीलंडपेक्षा जास्त असल्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या तर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील रेटिंग पॉईंट्समध्ये जवळपास ७०० अंकांचा फरक आहे. भारताच्या खात्यात ३७१७ रेटिंग पॉईंट्स आहेत तर न्यूझीलंडच्या खात्यात केवळ ३००० च रेटिंग पॉईंट्स आहेत.
(नोट- अद्याप आयसीसीने संघांची कसोटी क्रमवारी अपडेट केलेली नाही. आयसीसीकडून १९ जानेवारी २०२२ ला शेवटची अपडेट केली गेली होती. लवकरच आयसीसी संघांची अपडेटेड कसोटी क्रमवारी जाहीर करेल)