कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर लागले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ १८ ते २२ जून दरम्यान कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. साउथम्पटन येथे न्यूझीलंडविरुद्ध हा सामना होणार आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडने फार पुर्वीच संघ जाहीर केला होता. परंतु भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. अशात लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय जंबो स्क्वॅडची निवड करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणाला या संघात नव्याने संधी मिळेल, कोणाला वगळले जाईल आणि कोणाचे पुनरागमन होईल? अशा प्रश्नांचे चाहत्यांना वेध लागले आहे.
क्रिकबझनुसार, बीसीसीआयने जंबो स्क्वॅडची निवड करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, इंग्लंडलमध्ये त्यांना सराव सामने खेळण्याची परवानगी मिळण्याची शक्यता धूसर आहे. अशात भारतीय संघ आपाससात संघ बनवून सराव सामना खेळू शकतो. या संघात कमीत कमी ४ सलामीवीर, ४ मधल्या फळीतील फलंदाज, २-३ यष्टीरक्षक, ८-९ वेगवान गोलंदाज आणि ५ फिरकीपटूंना निवडले जाऊ शकते. भारतीय संघाची निवड झाल्यानंतर सहभागी खेळाडू लवकरच इंग्लंडला रवाना होतील. जेणेकरुन त्यांना तेथील परिस्थितीशी जुळवून घेता येईल.
हार्दिक होऊ शकतो बाहेर
चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती या संघाची निवड करु शकते. अशात अष्टपैलू हार्दिक पंड्याला बाहेरचा रस्ता दाखवली जाण्याची शक्यता आहे. कारण हार्दिक एक दमदार अष्टपैलू असूनही दुखापतीमुळे मागील काही काळापासून अधिक गोलंदाजी करु शकलेला नाही. दुसरीकडे सध्या दमदार अष्टपैलूंचे बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे हार्दिकला दुर्लक्षित करत इतर अष्टपैलूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
पृथ्वी शॉलाही मिळणार डच्चू
युवा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व करताना धडाकेबाज खेळी केल्या आहेत. परंतु भारतीय कसोटी संघात आधीपासूनच ४ सलामीवीर उपलब्ध आहेत. यात रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुबमन गिल आणि केएल राहुलचा समावेश होतो. त्यामुळे पृथ्वीला संघाबाहेर बसावे लागू शकते.
प्रसिद्ध कृष्णाला मिळू शकते संधी
महत्त्वाचे म्हणजे, मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला या संघात निवडले जाऊ शकते. त्याने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत ३ सामने खेळताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याच्या ५४ धावांवर ४ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे. याबरोबरच वेगवान गोलंदाज प्रसिद्धला देशांतर्गत स्तरावर थोडाफार कसोटी स्वरुपातील सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ९ सामने खेळताना ३४ विकेट्सची कामगिरी केली आहे.
प्रसिद्ध व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांनाही सहभागी केले जाऊ शकते. तसेच मोहम्मद शमीला पुनरागमनाची संधी दिली जाईल. रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
अश्विन आणि अक्षर राहमार कायम
फिरकी गोलंदाजी विभागात आर अश्नि आणि अक्षर पटेल यांना कायम ठेवले जाऊ शकतो. याबरोबरच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही जागा मिळणे जवळपास निश्चित आहे. केएस भरतला तिसऱ्या यष्टीरक्षकाच्या रुपात निवडले जाऊ शकते. तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांचे स्थान पक्के असल्यासारखे आहे.
असा असू शकतो भारतीय संघ-
केएल राहुल, मयंक अगरवाल, शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, वृद्धिमान साहा, केएस भरत, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
महत्त्वाच्या बातम्या-
कठोर परिश्रमाचे मिळणार फळ! कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी ‘या’ युवा खेळाडूंना मिळणार संधी?
फॉर्म सुधारण्यासाठी भारतातून इंग्लंडला घेतली धाव, तिथेही ठरला अपयशी; आता संघातील स्थान आलं धोक्यात
टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकते ‘सरप्राइज एंट्री’, पाहा कोण आहे तो