भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी स्पेशलिस्ट हनुमा विहारी मागील काही काळापासून संघर्ष करताना दिसत आहे. गतवर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक सामना वगळता त्याला इतर कोणत्याही सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे इंग्लंड शहरातील साउथम्पटन येथे १८ ते २२ जूनदरम्यान होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी तो इंग्लंडला गेला होता. परंतु तिथेही त्याची फलंदाजी कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्याचे भारतीय कसोटी संघातील स्थान धोक्यात आले आहे.
इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या विहारीला वार्विकशायर संघाने बाकावर बसवले आहे. त्याच्याजागी दक्षिण आफ्रिकाचा फलंदाज पीटर मलान याला संधी देण्यात आली आहे. त्याला केवळ एका सामन्यासाठी बाहेर केले गेले, का त्याचा वार्विकशायर संघासोबतचा करार संपला आहे?, हे अद्याप स्पष्ट नाही.
हनुमा विहारीचे खराब प्रदर्शन
विहारीसाठी काउंटी क्रिकेटमधील आतापर्यंत प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिले आहे. त्याने आतापर्यंत काउंटी क्रिकेटमध्ये वार्विकशायर संघाचे प्रतिनिधित्व करताना केवळ १०० धावा केल्या आहेत. दरम्यान तो दोन वेळा शून्यावर बाद झाला आणि दोन वेळा ८ धावा करु शकला आहे. केवळ ऍसेक्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ३२ चेंडूत ५२ धावांची चांगली कामगिरी केली होती.
त्याच्या याच कामगिरीला पाहता वार्विकशायर संघाने ६ मे पासून सुरू झालेल्या वार्विकशाय विरुद्ध वोर्सेस्टरशायर सामन्यातून डच्चू दिला आहे. या सामन्यात त्याच्याजागी संधी दिलेल्या मलानने पहिल्याच डावात ३२ धावांची खेळी केली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ठरला होता अपयशी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या मागील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतही तो लौकिकास साजेशी कामगिरी करु शकला नव्हता. ३ सामन्यात फलंदाजी करताना त्याने अवघ्या ७२ धावा केल्या होत्या. सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात दुखापतीवर दुर्लक्ष करत त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत चिवट झुंज दिली होती. त्याच्या योगदानामुळे भारतीय संघ तो सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला होता. परंतु या सामन्यात १६१ चेंडूंचा सामना करताना त्याने अवघ्या नाबाद २३ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२१ लिलावात अनसोल्ड राहिल्याने त्याने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी काउंटी क्रिकेट खेळण्याचे ठरवले. परंतु त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीला पाहता त्याला भारतीय कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता फार धूसर आहे.