इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक हिरे गवसले आहेत. ज्यांनी या स्पर्धेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आता ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू आहेत. यात सर्वात मोठे नाव म्हणजे जसप्रीत बुमराह.
बुमराहने २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण केले होते. काही वर्षानंतर त्याने भारतीय संघात पदार्पण केले आणि आता तो भारतीय संघातील मुख्य गोलंदाज आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेतही असे काही खेळाडू आहेत, ज्यांना आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी ‘सरप्राइज एन्ट्री’ मिळू शकते.
या स्पर्धेत युवा खेळाडूंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. येत्या काही दिवसांत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ घोषित केला जाऊ शकतो. तसेच या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठीही लवकरच बीसीसीआय संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. अशात या संघात आयपीएल २०२१ चा हंगाम गाजवलेले असे ३ खेळाडू आहेत, ज्यांना या संघात स्थान मिळू शकते.
१) प्रसिद्ध कृष्णा : इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत प्रसिद्ध कृष्णाला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत त्याने वेगवान गोलंदाजी आणि अचूक यॉर्कर चेंडू टाकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यानंतर आयपीएल २०२१ हंगामात देखील त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ७ सामने खेळले आहेत. यात त्याने ८ गडी बाद केले होते. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याऐवजी प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात येऊ शकते.
२) आवेश खान : आवेश खानने दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना उल्लेखनीय कामगिरी केली होती. गोलंदाजीमध्ये गती कमी असली तरीही त्याने आपल्या अचूक लाईन लेंथने मोठमोठ्या फलंदाजांना माघारी धाडले होते. त्याने या हंगामात ८ सामने खेळले आहेत. यात त्याला १४ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच भुवनेश्वर कुमार आयपीएल स्पर्धेत दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाला धक्का बसला आहे. त्याच्याऐवजी आवेश खानला संघात स्थान देण्यात येऊ शकते.
३) देवदत्त पडीक्कल : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कल याने या हंगामात देखील तुफान फटकेबाजी केल्याचे दिसून आले आहे. त्याने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ५१ चेंडूत शतकी खेळी केली होती. त्याने आयपीएल २०२० स्पर्धेत देखील १५ सामन्यात ४७३ धावा केल्या होत्या. तसेच केएल राहुलची सर्जरी झाली असल्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी देवदत्त पडीक्कलला संधी देण्यात येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
फॉर्म सुधारण्यासाठी भारतातून इंग्लंडला घेतली धाव, तिथेही ठरला अपयशी; आता संघातील स्थान आलं धोक्यात
टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकते ‘सरप्राइज एंट्री’, पाहा कोण आहे तो