---Advertisement---

आमचा नाद करायचा न्हाय! भारतीय संघाने ‘या’ विक्रमात पाकिस्तानला टाकले मागे; ऑस्ट्रेलिया संघही घसरला खाली

Team-India
---Advertisement---

रविवारी (२७ फेब्रुवारी) भारतीय संघाने श्रीलंकेला (India vs Sri Lanka) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात ६ विकेट्सने पराभूत केले. या विजयासोबतच भारताने मालिकाही खिशात घातली. हा भारताचा मागील आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सलग १२ वा विजय होता. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १४६ धावा केल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने अवघ्या १६.५ षटकात ४ विकेट्स गमावून पूर्ण केले आणि सामना जिंकला. या विजयासोबत भारताने पाकिस्तान संघाला मागे टाकत एक जागतिक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

भारतीय संघाचा जागतिक विक्रम
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताने आव्हानाचा पाठलाग करताना आपला ५४ वा सामना जिंकला. यासोबत भारताने पाकिस्तानलाही मागे टाकले. आता भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवणारा पहिला देश बनला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ७४ सामन्यात धावांचा पाठलाग केला आहे. यात भारताला ५४ सामन्यात विजय मिळाला आहे.

दुसरीकडे पाकिस्तान संघाने आतापर्यंत ८६ सामन्यात धावांचा पाठलाग केला आहे, ज्यातील ५३ सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. यासोबतच ते आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. तसेच, ५१ विजयांसोबत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत एकूण ९१ सामन्यांमध्ये धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचा थोडक्यात आढावा
श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. त्यात भारताने ६२ धावांनी विजय मिळवला होता. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात भारताने धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला होता. धावांचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने, तर तिसऱ्या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला होता.

धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक टी२० सामने जिंकणारे जगातील अव्वल ३ संघ

५४ विजय*- भारत (७४ सामने)
५३ विजय- पाकिस्तान (८६ सामने)
५१ विजय- ऑस्ट्रेलिया (९१ सामने)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---