भारतीय संघ जुलै महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघ १ कसोटी सामना, ३ वनडे सामने आणि ३ टी२० सामने खेळतील. तसेच पाहुणा भारतीय संघ या दौऱ्यात डर्बीशायर आणि नॉर्थम्पटनशायर या संघांविरुद्ध टी२०चे सराव सामनेही खेळण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला होतील सराव सामने
१ जुलै रोजी इंकोरा काउंटी मैदानावर भारत आणि डर्बीशायर संघ पहिला टी२० सराव सामना खेळतील. ज्यानंतर ३ जुलै रोजी नॉर्थम्पटनशायरविरुद्धचा दुसरा टी२० सामना होईल. हे सामने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.३० वाजता) होणार आहेत.
या सराव सामन्यांबद्दल माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, “टी२० क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाविरुद्ध डर्बीशायरचा संघ आयसीसी टी२० विश्वचषकासाठी तयारी करण्यासाठी हा सामने खेळेल. डर्बीशायर संघाकडून पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय खेळाडू शान मसूद आणि श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलही मैदानात उतरतील.”
नॉर्थम्पटनशायर क्रिकेट संघाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “नॉर्थम्पटनशायर संघ या उन्हाळ्यातील भारताच्या टी२० सराव सामन्याचे (T20 Practice Matches) स्वागत करत आहे. टी२०तील अव्वल संघाविरुद्ध हा सामना खेळण्याचा रोमांच वेगळाच असेल. ३ जुलै रोजी होणाऱ्या या सामन्यासाठीचे तिकीट येत्या आठवड्यात उपलब्ध होतील.”
हेही वाचा- Video: ‘तू फरारी आहेस, लवकरच सहाव्या घेरमध्ये जावा’, डेल स्टेनचा त्यागीला मोलाचा सल्ला
आंतरराष्ट्रीय मालिकांचे वेळापत्रक
या सराव सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध (India vs England) आपला पुनर्निर्धारित पाचवा कसोटी सामना (IND vs ENG Rescheduled Test Match) खेळेल. या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. हा सामना १-५ जुलैदरम्यान बर्मिंघमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर होईल. हा सामना २०२१ मध्येच मँचेस्टरच्या ओल्ड टॅफर्ड स्टेडियमवर होणार होता. परंतु भारतीय संघात कोविड-१९ चा उद्रेक झाल्यामुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता.
या कसोटी सामन्यानंतर उभय संघ ७ ते १० जुलैदरम्यान ३ सामन्यांची टी२० मालिका (3 Matches T20 Series) खेळतील. हे सामने अनुक्रमे ७, ९ आणि १० जुलै रोजी होतील. त्यानंतर १२, १४ आणि १७ जुलै रोजी वनडे सामने (3 Matches ODI Series) खेळवले जातील.
इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेचे पूर्ण वेळापत्रक (India Tour Of England)-
१-५ जुलै: पाचवा कसोटी सामना (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम) (रिशेड्यूल्ड सामना)
७ जुलै: पहिला टी२० सामना (द रोझ बाउल, साउथम्प्टन)
९ जुलै: दुसरा टी२० सामना (एजबॅस्टन, बर्मिंगहॅम)
१० जुलै: तिसरा टी२० सामना (ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम)
१२ जुलै: पहिला वनडे सामना (केनिंग्टन ओव्हल)
१४ जुलै: दुसरा वनडे सामना (लॉर्ड्स, लंडन)
१७ जुलै: तिसरी वनडे सामना (एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)
महत्त्वाच्या बातम्या-
एकेवेळी व्हिडीओ गेमच्या नादी लागलेला अकोल्याचा वाघ ‘दर्शन नळकांडे’ आयपीएल गाजवण्यास सज्ज