---Advertisement---

उद्या विंडीज विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी२०साठी अशी असू शकते ११ जणांची टीम इंडिया

On: गुरूवार, डिसेंबर 5, 2019 7:01 PM
---Advertisement---

उद्यापासून(6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैद्राबाद येथे होणार असून या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

या मालिकेतून भारताचा कर्णधार विराट कोहली भारताच्या टी20 संघात पुनरागमन करेल. त्याला मागील महिन्यात बांगलादेश विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

या सामन्यासाठी असा असू शकतो 11 जणांचा भारतीय संघ – 

सलामीवीर फलंदाज – रोहित शर्मा, केएल राहुल

रोहित सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दुसऱ्या टी20 सामन्यात 85 धावांची खेळी केली होती. तसेच तो मागील अनेक वर्षांपासून भारताकडून सलामीला फलंदाजी करत आहे. त्यामुळे तो या 11 जणांच्या संघात कायम असेल.

तसेच रोहितचा सलामीवीर साथीदार शिखर धवन दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर असल्याने त्याच्याऐवजी सलामीला राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुलने देशांतर्गत स्पर्धेत मागील काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.

त्याने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये विजेत्या कर्नाटक संघाकडून खेळताना 8 सामन्यात 52.16 च्या सरासरीने 313 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

मधली फळी – विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे 

कर्णधार विराट अनेक दिवसांनंतर टी20 क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आता तो टी20 मध्ये कशी कामगिरी करतो ते पहावे लागणार आहे. त्याने नुकत्याच बांगलादेश विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली आहे. त्यामुळे तो हीच लय कायम राखण्यास उत्सुक असेल.

तसेच अय्यरने मागील अनेक सामन्यात चांगली कामगिरी करत स्वत:ला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. त्याने बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेतही शानदार कामगिरी केली होती. तो त्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यामुळे तो उद्याच्या सामन्यासाठीही 11 जणांच्या भारतीय संघात कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

याबरोबरच मनिष पांडेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तमिळनाडूविरुद्ध नाबाद 60 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने वेळोवेळी त्याला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यालाही उद्या होणाऱ्या सामन्यासाठी 11 जणांच्य़ा भारतीय संघात संधी मिळू शकते.

यष्टीरक्षक – रिषभ पंत

भारताकडे रिषभ पंत आणि संजू सॅमसन असे दोन यष्टीरक्षणाचे पर्याय आहेत. पण भारतीय संघ रिषभलाच संधी देण्याची दाट शक्यता आहे. मागील अनेक महिन्यांपासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी फलंदाजीत खराब कामगिरी झाली असली तरी पंतला पसंती देण्यात येत आहे.

भारतीय संघ टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने पंतला संधी देत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठीही 11 जणांच्या संघात यष्टीरक्षक म्हणून त्यालाच संधी दिली जाऊ शकते.

अष्टपैैलू क्रिकेटपटू – शिवम दुबे, रविंद्र जडेजा 

शिवम दुबेला बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेतून पहिल्यांदा भारताच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही गोलंदाजीत चांगले प्रदर्शन केले. तसेच त्याच्याकडे आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता असल्याने उद्या त्याला 11 जणांच्या भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.

त्याचबरोबर जडेजाही भारतीय टी20 संघात परतला आहे. त्यामुळे तोही 11 जणांच्या संघात असण्याची शक्यता आहे. त्याच्या संघात असल्याने भारताच्या फलंदाजीला सखोलता मिळेल. तसेच त्याची गोलंदाजीही महत्त्वाची ठरेल.

गोलंदाज – युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, दीपक चाहर

जडेजाच्या जोडीला फिरकी गोलंदाज म्हणून चहलला संधी मिळू शकते. चहलचे बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेतून भारताच्या टी20 संघात पुनरागमन झाले आहे. त्याला त्याआधी भारताच्या मागील अनेक टी20 मालिकेतून वगळण्यात आले होते. त्यानेही पुनरागमन करताना चांगली कामगिरी केली आहे.

याबरोबरच शमीनेही मागील अनेक सामन्यातून सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र त्याला गेल्या 2 वर्षांपासून भारताकडून टी20 संघात संधी मिळालेली नाही. तो शेवटचा टी20 सामना जूलै 2017 मध्ये खेळला आहे. पण त्याने मागील काही दिवसात केलेल्या कामगिरीचा विचार करता त्याला आता उद्या भारताच्या 11 जणांच्या संघात संधी दिली जाऊ शकते.

तसेच बांगलादेश विरुद्धचा हॅट्रीक हिरो दीपक चाहरही वेगवान गोलंदाज म्हणून शमीच्या साथीला असेल. चाहरने भारताबरोबरच देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 7 आंतरराष्टीय टी20 सामन्यात 14 विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच त्याची गोलंदाजी इकोनॉमी रेटही चांगला आहे. त्यामुळे तोही उद्या 11 जणांच्या भारतीय संघात असू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---