सोमवार रोजी (०६ डिसेंबर) न्यूझीलंडचा भारत दौरा संपला. गेल्या ४ दिवसांपासून वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याने हा दौरा संपला. भारताने या सामन्यात तब्बल ३७२ धावांच्या फरकाने विजय मिळवला आणि १-० च्या फरकाने मालिकाही जिंकली. यापूर्वीचा कानपूर येथील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून यासंदर्भात मोठी अपडेट पुढे येते आहे. (Update About India’s South Africa Tour)
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या (India Tour Of South Africa) पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. २६ डिसेंबरपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात होणार आहे. याआधी ८ ते ९ डिसेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयने यामध्ये काही बदल असल्याचे सांगितले आहे.
बीसीसीआयने ९० व्या एजीएमनंतर यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, “सुरुवातीला भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता. परंतु आता हे सामने २६ डिसेंबरपासून सुरू होतील. या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळेल. ४ सामन्यांची टी२० मालिका नंतर खेळली जाईल.”
दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या ओमिक्रॉन व्हेरिएंट ( Omicron Variant) रुग्ण संख्येमुळे या दौऱ्यात बदल करावे लागले आहेत. या कोविड-१९ च्या नव्या व्हेरिएंटने दक्षिण आफ्रिकेत हाहाकार माजवला आहे. त्यामुळे आता २६ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होईल. १५ जानेवारी २०२२ रोजी ही ३ सामन्यांची कसोटी मालिका संपेल. त्यानंतर अनुक्रमे १९, २१ आणि २३ जानेवारी रोजी ३ वनडे सामने खेळवले जातील.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे बदललेले वेळापत्रक (Team India’s South Africa Tour Changed Timetable):
कसोटी मालिका-
पहिली कसोटी: २६-३० डिसेंबर, सेंच्युरियन
दुसरी कसोटी: ३-७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी: ११-१५ जानेवारी, केपटाऊन
वनडे मालिका-
पहिली वनडे: १९ जानेवारी, पर्ल
दुसरी वनडे: २१ जानेवारी, पर्ल
तिसरी वनडे: २३ जानेवारी, केपटाऊन
गुणांमध्ये वाढ पण स्थान मात्र तेच
दरम्यान भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपल्या गुणसंख्येत चांगली वाढ केली आहे. ही मालिका जिंकत भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यातील ३ सामने जिंकले आहेत आणि १ सामना गमावला आहे. उरलेले २ सामने अनिर्णित राहिले आहेत. यासह भारतीय संघाच्या खात्यात ४२ गुण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाचा दिलदारपणा! कानपूर कसोटीनंतर आता वानखेडे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनाही दिले मोठे बक्षीस
अश्विनने सांगितलं आणि एजाजचं अनेक १० वर्ष रखडलेलं काम झटक्यात झालं