आपण सध्या एकविसाव्या शतकात म्हणजेच तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. आपल्या दैनंदिन जीवनाचा बराचसा भाग तंत्रज्ञानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या सर्वात क्रिकेट तरी का मागे राहील ? आज क्रिकेटमध्ये तंत्रज्ञान मोठी भूमिका पार पाडत आहे. केवळ निर्णय घेताना मानवी चुका कमी करण्यासाठी नव्हे तर खेळाडू व प्रशिक्षकांना त्यांच्या खेळाचे विश्लेषण करण्यासाठी याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज लागते.
सोळाव्या शतकात क्रिकेटचा उदय झाल्यापासून, आज क्रिकेट खूप पुढे आले आहे. वेळेसह क्रिकेट सतत विकसित होत गेले, तंत्रज्ञान देखील वेगवान झाले आणि नवनवीन तंत्रानुसार बदलले आहे. १९८० किंवा १९९० च्या दशकांपेक्षा आज क्रिकेट सामना पाहण्याचा अनुभव खूपच आकर्षक आणि अप्रतिम बनला आहे. उच्च दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे यामागील मुख्य कारण आहे.
१९९२ मध्ये धावबाद वा तत्सम निर्णय तिसऱ्या पंचांनी टेलिव्हिजनवर पाहून देण्यास सुरुवात केली, तेव्हापासून खऱ्या अर्थाने क्रिकेट व आधुनिक तंत्राचा संपर्क आला. २००६ मध्ये हॉटस्पॉट व स्निकोमीटर हे तंत्र क्रिकेटचाहत्यांनी प्रथम पाहिले. अनेक वादविवादांनंतर २००८ मध्ये भारत-श्रीलंका एकदिवसीय सामन्यात “प्लेयर रेफरल सिस्टीम” ची चाचणी घेण्यात आली व २४ नोव्हेंबर २००९ ला न्यूझीलंड-पाकिस्तान दरम्यानच्या कसोटी मालिकेत आयसीसीने परवानगी देत, हे तंत्र वापरायला सुरुवात केली. २०११ मध्ये आयसीसीने “अंपायर डिसिजन सिस्टिम रिव्यू सिस्टीम” असे नामकरण करत हे तंत्र प्रत्येक सामन्यात अनिवार्य केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रखर विरोधानंतर, आयसीसीने नमते घेत, दोन्ही संघ राजी असतील तरच हे तंत्र मालिकेत वापरण्यात येईल असा नियमबदल केला. मात्र, आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये युडीआरएस वापरणे बंधनकारक होते.
या युडीआरएस अथवा डीआरएसमधील दोन महत्त्वाची तंत्रज्ञाने म्हणजे हॉटस्पॉट आणि स्निकोमीटर. जवळपास प्रत्येक सामन्यात पंचांना निर्णय घेण्यास या दोन तंत्रांची मदत होते. सामन्यावेळी, वारंवार कानावर पडणाऱ्या हॉटस्पॉट किंवा स्निकोमीटर या शब्दांमागील संरचना शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला का? अगदी क्लिष्ट दिसत असली तरी त्यांची यंत्रणा अगदी सोपी आहे. आज याच हॉटस्पॉट व स्निकोमीटर या दोन तंत्रांच्या संरचनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
१) हॉटस्पॉट आणि त्याची संरचना
हॉटस्पॉट ही एक इमेज सेन्सींग सिस्टम आहे, जी फलंदाजाच्या बॅटला बॉल लागला आहे की नाही, हे शोधण्यासाठी इन्फ्रारेड कॅमेर्यांचा वापर करून वापरली जाते. हे तंत्रज्ञान सर्वप्रथम क्रिकेटमध्ये मेलबर्नस्थित बीबीजी कंपनीने आणले होते. खरंतर, एका सामन्यावेळी दोन इन्फ्रारेड कॅमेरे पुरेसे असतात. तरीही, खेळावर सतत, वेगवेगळ्या बाजूने नजर ठेवण्यासाठी चार इन्फ्रारेड कॅमेरे वापरले जातात. हॉटस्पॉट तंत्रज्ञानाचा शोध फ्रेंच वैज्ञानिक निकोलस बायन यांनी लावला होता. लष्करी रणगाडे व लढाऊ विमानांच्या मागोवा घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जात.
या तंत्रातील मूलभूत तत्व म्हणजे थर्मल वेव्ह रिमोट सेन्सिंग. जेव्हा बॉलचा बॅट अथवा पॅडशी किंवा फलंदाजाशी संपर्क होतो तेव्हा त्याठिकाणी घर्षण निर्माण होते. हे घर्षण उष्णतेस कारणीभूत ठरते, उष्णतेमुळे तापमानातील हलकासा बदल इन्फ्रारेड इमेजिंग कॅमेरा सिस्टम पकडते. अशाप्रकारे,इन्फ्रारेड प्रतिमेचे परीक्षण करून काही चुकीचा निर्णय असेल तर तो पंचांकरवी बदलला जाते. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिकेदरम्यान या तंत्रज्ञानाचा प्रथम वापर करण्यात आला होता.
२) स्निकोमीटर व त्याची संरचना
स्निकोमीटर हे आणखी एक तंत्रज्ञान आहे जे बीबीजी कंपनीने सुरू केले होते. स्निकोमीटरचा शोध एक इंग्रजी संगणक शास्त्रज्ञ ऍलन प्लास्केट यांनी लावला होता. ९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात शोधले गेलेले हे तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारची कड लागली असेल, तर शोधण्यासाठी ध्वनी आणि चलचित्र या दोहोंचा पुरावा देते. स्निको हे पूर्णतः अचूक तंत्रज्ञान नाही, परंतु हॉटस्पॉटसोबत एकत्रितपणे कार्य करत असल्याने, विश्वासार्ह नक्कीच आहे.
स्निको एक सोप्या तत्त्वावर कार्य करते. स्टंप्सला एक अतिशय संवेदनशील मायक्रोफोन लावला जातो आणि हा मायक्रोफोन एका ऑसीलोस्कोपशी जोडलेला असतो, जो ध्वनी लहरींचा मागोवा घेतो. कोणतीही कड लागल्यास, मायक्रोफोन अगदी थोडासा आवाजही रेकॉर्ड करतो. यानंतर स्लो-मोशन व्हिडिओसह रेकॉर्ड केलेला ट्रेस प्ले केला जातो, जो काही संपर्क आहे की नाही हे निश्चित करतो. पुढे, शहानिशा करून तिसरे पंच आपला निर्णय मैदानावरील पंचांना सांगतात.