दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यापूर्वी त्यानं एक मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. 24 वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या आधी एक खळबळजनक खुलासा केला. जोकोविच म्हणाला की, 2022 मध्ये मेलबर्नमध्ये त्याला विषबाधा झाली होती. त्यावेळी त्याला कोरोना लस न घेतल्याबद्दल क्वारंटाइन करण्यात आलं होतं. जोकोविचच्या दाव्यानुसार, त्या दरम्यान त्याच्या जेवणात काही पदार्थ मिसळले गेले होते, जे ‘विष’ होतं.
जोकोविचनं GQ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “मला काही आरोग्याच्या समस्या होत्या. मला जाणवलं की मेलबर्नमधील त्या हॉटेलमध्ये मला असं काहीतरी खायला दिलं गेलं जे विष होतं.” जोकोविचनं सांगितलं की, नंतर त्याला त्याच्या शरीरात शिसे आणि पाराचे अंश आढळले. कोविड लसीच्या वादामुळे जोकोविचला ऑस्ट्रेलियातून परत पाठवण्यात आलं होतं. तो पुढे म्हणाला, “जेव्हा मी सर्बियाला परतलो तेव्हा मला शरीरात काहीतरी जाणवलं. मी हे कधीच कोणालाही जाहीरपणे सांगितलं नाही, पण मला आढळलं की माझ्या शरीरात जड धातूंचं प्रमाण खूप जास्त आहे. माझ्या शरीरात शिसं आणि पाराचं प्रमाण खूप जास्त होतं”
2022 ऑस्ट्रेलियन ओपन दरम्यान नोवाक जोकोविचबाबत मोठा वाद झाला होता. जोकोविचनं कोविड लसीकरणास नकार दिल्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. यामुळे तो स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याबद्दल त्याला ताब्यातही घेण्यात आलं होतं. यासोबतच त्याला चार दिवस एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं, जे एक डिटेन्शन सेंटर होतं. अखेर त्याला ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आलं. जोकोविचने कोरोनाची लागण झाल्याची माहिती लपवली होती, असा दावा ऑस्ट्रेलियन सरकारतर्फे करण्यात आला होता.
नोव्हाक जोकोविच पुढच्याच वर्षी मेलबर्नला परतला आणि त्यानं ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब जिंकला. हे त्याचं दहावं जेतेपद होतं. जोकोविच म्हणाला, “त्याला ऑस्ट्रेलियन लोकांबद्दल कोणताही द्वेष नाही. गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियात किंवा जगात इतरत्र भेटलेले अनेक ऑस्ट्रेलियन लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याशी झालेल्या वागणुकीबद्दल माफी मागितली. त्यांना त्यांच्याच सरकारची लाज वाटत होती.”
यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनला 12 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदा जोकोविचचं लक्ष्य 11वं विजेतेपद जिंकण्याकडे असेल. जर तो यात यशस्वी झाला, तर तो 25 ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला टेनिसपटू ठरेल.
हेही वाचा –
पुजारा-रहाणे नाही, या खेळाडूचे डिफेंस जगात सर्वोत्तम, माजी गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अशी असू शकते टीम इंडिया, ऋतुराजला संधी मिळणार का?
“गौतम गंभीरने नाही तर मी सुनील नारायणला आणले”, केकेआरच्या माजी फलंदाजाचा मोठा दावा