भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने दुसऱ्या दिवशी चांगले पुनरागमन केले आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या टीम साऊदीने पहिल्या सत्रामध्ये तब्बल चार विकेट्स घेतल्या. तर दुसरीकडे भारतासाठी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली. भारतीय संघ दुपारच्या जेवनानंतर सर्वबाद झाला. भारताने एकूण १११.१ षटकांचा सामना केला आणि संघ पहिल्या डावात ३४५ धावांवर सर्वबाद झाला. साऊदीने या सामन्यात स्वतःच्या नावाव एक खास विक्रमाची नोंद केली आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने ४ विकेट्सच्या नुकसानावार २५८ धावा केल्या होत्या, दुसऱ्या दिवशी येथून पुढे खेळाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या षटकात भारतीय संघाला रवींद्र जडेजाच्या (५०) रुपात पहिला धक्का बसला. जडेजा दुसऱ्या दिवशी एकही धाव करू शकला नाही आणि साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. साऊदीने दिवसातील त्याचा दुसरा विकेट ऋद्धिमान साहाचा घेतला. साहा फक्त एक धाव करून तंबूत परतला.
श्रेयस अय्यरने दुसऱ्या दिवशी त्याचे शतक पूर्ण केले. त्याने १३ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावा केल्या. चांगल्या लयात असलेल्या अय्यरला देखील साऊदीनेच बाद केले. त्यानंतर अक्षर पटेल देखील अवघ्या तीन धावा करून साऊदीच्या चेंडूचा शिकार झाला. तत्पूर्वी त्याने सामन्याच्या पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराचा (२६) देखील विकेट घेतला होता. अशाप्रकारे त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात एकूण पाच विकेट्स घेतले. कानपूरमध्ये १९५७ नंतर साऊदी पहिलाच विदेशी गोलंदाज ठरला आहे, ज्याने सामन्याच्या एका डावात पाच विकेट्स घेतल्या. यापूर्वी १९७९ मध्ये पाकिस्तानच्या सिकंदर बख्त आणि एहतेसामुद्दीन यांनी ही कामगिरी गेली होती.
एकंदरीत भारताच्या पहिल्या डावात न्यूझीलंड संघाचे वेगवान गोलंदाज प्रभावी कामगिरी करू शकले. साऊदी व्यतिरिक्त जेमिसनने देखील तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. भारताचे शेवटचे दोन विकेट्स मात्र, न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने घेतले.