30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये 12 व्या आयसीसी विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या विश्वचषकाला 100 पेक्षाही कमी दिवस उरले असल्याने सर्वच संघांनी अंतिम तयारीला सुरुवात केली आहे.
यावर्षीचे विश्वचषकाचे स्वरुप बदलण्यात आले आहे. हा विश्वचषक राउंड रॉबिन पद्धतीने खेळला जाणार आहे. म्हणजेच 10 संघात रंगणाऱ्या या विश्वचषकात प्रत्येक संघ साखळी फेरीत एकमेकांविरूद्ध लढतील आणि यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
ही पद्धत विश्वचषकात दुसऱ्यांदाच वापरली जाणार आहे. याआधी 1992 ला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरित्या पार पडलेल्या विश्वचषकात ही पद्धत वापरण्यात आली होती. त्यावेळी सर्वांना धक्का देत पाकिस्तान संघाने विजेतेपद मिळवले होते.
असे स्वरुप आयपीएलमध्येही वापरले जाते. याच पद्धतीमुळे विराट कोहली कर्णधार असलेल्या भारतीय संघासाठीच नाही तर प्रत्येक संघासाठी हा विश्वचषक जिंकणे सोपे असणार नाही.
या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे राउंड रॉबिन पद्धतीप्रमाणे प्रत्येक संघाला साखळी फेरीत 9 सामने खेळावे लागणार आहेत. त्यानंतर गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे प्रत्येक संघाला सातत्याने चांगली कामगिरी करत रहावे लागणार आहे.
पहिला उपांत्य सामना गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघामध्ये होईल, तर दुसरा उपांत्य सामना गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या संघात रंगेल.
46 दिवस चालणाऱ्या विश्वचषकात एकूण 48 सामने होणार आहेत. इंग्लड आणि वेल्समधील एकूण 11 मैदानांवर हे सामने होणार आहेत. तसेच 14 जूलैला लॉर्डसच्या मैदानावर या विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे.
यामुळे लॉर्डसला पाचव्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना घेण्याचा मान मिळणार आहे. यापूर्वी 1975, 1979, 1983 आणि 1999 साली लॉर्ड्सवर विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला होता.
आत्तापर्यंत विश्वचषकात 12 किंवा 14 संघ सहभागी होत होते. परंतू यावेळेस 10 संघच सहभागी होणार आहेत. यावेळी विश्वचषकाच्या पात्रता निकषामध्ये बदल करण्यात आला आहे.
आयसीसी क्रमवारीप्रमाणे पहिला आठ संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर दोन स्थानांसाठी पात्रता फेरी पार पडली. ज्यातून विंडीज आणि अफगाणिस्तानने विश्वचषकातील सहभाग निश्चित केला.
आत्तापर्यंत 1975 ते 1987 पर्यंत विश्वचषकाची स्पर्धा गटवारी पद्धतीने होत होती. त्यानंतर 1992 ला राउंड रॉबीन पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. पण 1996 विश्वचषकात गटवारी पद्धतच पुन्हा आणण्यात आली. त्यानंतर 1999 च्या विश्वचषकात गटवारी पद्धतीतील सामन्यानंतर सुपर 6 पद्धतीचाही समावेश करण्यात आला. हीच पद्धत 2003 च्या विश्वचषकातही कामय राहिली.
पण 2007 च्या विश्वचषकात सुपर 6 च्या ऐवजी सुपर 8 चा समावेश करण्यात आला. त्यामुळे दोन गटा ऐवजी पहिल्यांदाच विश्वचषकात 4 गट करण्यात आले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचाही समावेश करण्यात आला.
पण 2011 ला पून्हा दोन गटात साखळी फेरी पार पडली आणि उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना अशा स्वरुपात ही स्पर्धा झाली. 2015 चा विश्वचषकही याच पद्धतीने खेळला गेला. पण आता पुन्हा विश्वचषकाच्या स्परुवात यावर्षी बदल करण्यात आला आहे.
यावर्षीच्या विश्वचषकात सलामीचा सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 30 मे रोजी होणार आहे. तर भारतीय संघ पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळणार आहे.
असे होतील भारताचे विश्वचषक 2019 चे सामने:
5 जून- भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका, रोज बॉल, साउथॅंप्टन
9जून- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल, लंडन
13जून- भारत विरूद्ध न्यूझिलंड, ट्रेंटब्रीज, नॉटिंगहॅम
16जून- भारत विरूद्ध पाकिस्तान, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
22जून- भारत विरूद्ध अफगाणिस्तान, रोज बॉल, साउथॅंप्टन
27जून- भारत विरूद्ध विंडिज, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
30जून- भारत विरूद्ध इंग्लड, एजबस्टन, बर्मिंगहॅम
02 जुलै- भारत विरूद्ध बांग्लादेश, एजबस्टन, बर्मिंगहॅम
06 जुलै- भारत विरूद्ध श्रीलंका, हेडिंगले, लीड्स
उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना
09 जुलै- पहिला उपांत्य सामना, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
11जुलै- दुसरा उपांत्य सामना, एजबस्टन, बर्मिंगहॅम
14 जुलै – अंतिम सामना, लॉर्डस
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा
–इशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर
–तब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच