भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला मेलबर्न येथे शनिवारी (26 डिसेंबर) सुरुवात होणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हणूनही ओळखला जाईल. त्यामुळे हा सामना सध्या बहुचर्चित आहे. विशेष म्हणजे यावर्षी केवळ भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातच नाही तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघातही बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
असे असले तरी नक्की बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडणे स्वाभाविक आहे. तर या लेखात आपण बॉक्सिंग डे म्हणजे काय आणि बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास काय याबद्दल जाणून घेऊ.
बॉक्सिंग डे म्हणजे काय?
‘बॉक्सिंग डे’ हा नाताळच्या दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी अनेक देशांत मालकाकडून त्याच्या नोकर आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्षभरातील चांगल्या कामाची भेट म्हणून ख्रिसमस बॉक्स दिला जातो. तसेच मित्रमैत्रीणी, नातेवाईक हे देखील एकमेकांना खास भेट देतात. त्यामुळे या दिवसाला ‘बॉक्सिंग डे’ असे म्हटले जाते.
त्याचबरोबर गरिब जनतेच्या मदतीसाठी नाताळाच्या दिवशी चर्चमध्ये एक बॉक्स ठेवला जातो, जो दुसऱ्या दिवशी उघडला जातो. यामुळेही या दिवसाला ‘बॉक्सिंग डे’ असे म्हटले जाते.
बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास
दरवर्षी 26 डिसेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना होणे ही वार्षिक परंपरा आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दरवर्षी खेळवला जातो. ऑस्ट्रेलिया संघ आणि पाहुण्या संघात हा सामना होतो. याबरोबरच ऑस्ट्रलिया व्यतिरिक्त अन्य देशातही बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवला जातो. पण ऑस्ट्रेलियातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला मोठा इतिहास आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सन 1980 मध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना झाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला आहे. त्याच्या एक वर्षआधी केरी पॅकर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटसाठी टेलिव्हिजन हक्क आणले होते.
पहिला बॉक्सिंग डे सामना सन 1950 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या संघात मेलबर्न येथे झाला होता. हा सामना 22 डिसेंबरला सुरु झाला होता आणि 27 डिसेंबरला संपला होता. त्याआधी सन 1892 मध्ये मेलबर्नमध्ये नाताळाच्या दरम्यान एक शेफिल्ड शील्डचा सामना झाला होता. तेव्हापासून व्हिक्टोरिया विरुद्ध न्यू साऊथ वेल्स यांच्यात नाताळाच्या दरम्यान क्रिकेट सामन्याची परंपरा सुरु झाली.
तसेच सन 1980 आधी फक्त चार वेळा मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला गेला आहे. यामध्ये सन 1952 मध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. या सामन्यापासून खऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली.
त्यानंतर सन 1968 आणि 1975 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवले होते. तसेच 1974 ला इंग्लंड विरुद्ध झालेला बॉक्सिंग डे कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.
त्याचबरोबर सन 1967, 1972 आणि 1976 या वर्षीही बॉक्सिंग डेला कसोटी सामना झाला होता पण हे सामने ऍडलेडमध्ये खेळवण्यात आले होते.
विशेष म्हणजे सन 1975 ला झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास 85 हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते. पण असे असले तरी त्यानंतरही बॉक्सिंग डे कसोटी सामने दरवर्षी नियमितपणे सुरु होण्यासाठी 5 वर्षे वाट पाहावी लागली.
सन 1980 पासून नियमित बॉक्सिंग डे कसोटी सामना –
सन 1980 नंतर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे बॉक्सिंग डे कसोटीसाठी कायमचे ठिकाण झाले आहे. फक्त 1989 मध्ये बॉक्सिंग डे कसोटीच्या परंपरेत थोडा बदल झाला होता. त्यादिवशी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात वनडे सामना पार पडला होता.
सन 1980 नंतर आत्तापर्यंत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 39 बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत.
भारताचा बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा इतिहास
सन 1980 नंतर मेलबर्नवर झालेल्या एकूण 39 बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांपैकी 8 सामन्यात भारतीय संघ खेळला आहे. भारताने सन 1985, 1991, 1999, 2003, 2007, 2011, 2014 आणि 2018 या 8 वर्षी बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला आहे. त्यातील सन 1985 आणि 2014 ला झालेला सामना अनिर्णित राहिला आहे. तर 2018 चा बॉक्सिंग डे कसोटी सामना भारताने जिंकला. त्याचबरोबर सन 1991, 1999, 2003, 2007 आणि 2011 ला झालेल्या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले आहे.
2020 ला होणारे बॉक्सिंग डे कसोटी सामने –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – मेलबर्न (भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजता)
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – माउंट मोंगनूई (भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3.30 वाजता)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका – सेंच्यूरियन (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता)
महत्त्वाच्या बातम्या:
“बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करायची आहे, तर ‘असा’ सराव करा”
मिस्टर क्रिकेटने केली पृथ्वी शॉची पाठराखण; मेलबर्न कसोटीत संधी देण्याची मागणी
शमीच्या दुखापतीमुळे ‘या’ वेगवान गोलंदाजाचा मार्ग मोकळा, मिळू शकते कसोटीत पदार्पणाची संधी