श्रीसंत हा कदाचित भारत क्रिकेट इतिहासातील सर्वात वादग्रस्त खेळाडू, तर दुसरीकडे हरभजन सिंग कदाचित भारताच्या टॉप शॉर्ट टेम्पर्ड खेळाडूंपैकी एक होता. भारतीय क्रिकेटला अनेक सुवर्णक्षण दाखवणारी ही जोडी आयपीएलच्या शानदार अध्यायातील पहिला वाद निर्माण करणारी जोडी बनली होती. याचे निमित्त होते स्लॅप-गेट. तेच स्लॅप- गेट प्रकरण म्हणजे हरभजनने श्रीसंतच्या कानाखाली लगावलेले कांड होय.
आयपीएल सुरू होऊन मोजून आठ दिवस झालेले होते. पहिल्या मॅचला मॅक्युलमने आपल्या बॅटने राडाच केला. शतकावर शतके होऊ लागलेली. काट्याचे मुकाबले सुरू होते. बडे- बडे आंतरराष्ट्रीय प्लेअर, चीअर लीडर्स या साऱ्या गोष्टी पहिल्यांदाच लोक पाहत होते. आयपीएल धडाक्यात सुरू झाली असली, तरी त्यावेळी सर्वात महागडी फ्रॅंचाईजी असलेल्या मुंबई इंडियन्सची बात काय बनत नव्हती. पहिल्या दोन्ही मॅचला त्यांनी कच खाल्ली. जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव सचिन तेंडुलकर याला कॅप्टन बनवलेले, पण दुखापतीमुळे तो निम्म्या आयपीएल नंतरच खेळायला रेडी होणार होता. त्यामुळे कॅप्टन्सीची जबाबदारी भारताच्या अनुभवी हरभजन सिंगवर होती.
पिचवर भल्याभल्यांना भांगडा करायला लावणारा भज्जी कॅप्टन म्हणून फ्लॉप ठरत होता. तिसरी मॅच किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्ध होती. ते ठिकाण मोहाली हे होते. तसं पाहायला गेलं, तर होम ग्राउंड पंजाबचे असले, तरी हरभजनलाही घरच्यासारखं फील होणार होतं. पंजाबने पहिली फलंदाजी केली आणि संगकाराने ९४ धावांचा तडाखा दिला आणि त्यांनी १८२ रन्स उभारल्या. मुंबईची बॅटिंग आली आणि पहिल्या दोन मॅचप्रमाणेच अवस्था झाली. इरफान, श्रीसंत आणि पीयुष चावलाने दोन-दोन विकेट घेत मुंबईचा डाव ११६ रन्सवर रोखला आणि ६६ रन्सनी दणदणीत विजय मिळवला.
इथपर्यंत सगळं काही ठीक झाले. अचानक खेळाडू हॅन्डशेक करत असताना टीव्हीवर श्रीसंत रडताना दिसला. प्रथमदर्शनी अनेकांना वाटले विजय मिळवल्याचा आनंद त्याला झाला आहे. व्हीआरव्ही सिंग त्याला सांत्वना देत होता. कोणाला काही समजले नाही. कॅमेरा मुंबईचा कॅप्टन हरभजन सिंगवर गेला. लोकांना तरीही इतकं काही वाटलं नाही. त्यानंतर काही वेळातच न्यूजमध्ये श्रीसंतच्या रडण्याचे कारण समोर आले. कारण होते हरभजनने त्याच्या कानाखाली मारल्याचे.
तर झाले असे की, पंजाबने मॅच जिंकली आणि दोन्ही टीमचे खेळाडू हॅन्डशेक करत होते. इतक्यात हरभजन आणि श्रीसंत समोरासमोर आले. श्रीसंत गमतीत म्हणाला, ‘हार्ड लक भज्जू पा.’ बस हे शब्द ऐकले अन् हरभजनचा पारा चढला. त्याने मागचा पुढचा विचार केला नाही आणि सनकन श्रीसंतच्या कानशिलात ठेवून दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पंजाब मॅनेजमेंटने हरभजनची तक्रार मॅच रेफ्री फारुख इंजीनियर यांच्याकडे केली. त्यांनी प्राथमिक चौकशी केली आणि सरळ हरभजनवर सिझनचा बॅन लावला.
त्यावेळी आयपीएलला आयसीसी आणि बीसीसीआय टी२०चा एक प्रोटोटाइप म्हणून बघत होते. बीसीसीआयला ही टूर्नामेंट यशस्वी करायची होती, पण लवकरच इतका मोठा वाद झाल्याने टूर्नामेंटवर प्रश्नचिन्ह लावले गेले. त्यावेळी बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जस्टीस नानावटी यांची नियुक्ती केली. त्यांनी दोन्ही खेळाडूंची दोन तास चौकशी केली. हरभजनने आपली चूक मान्य केली. नानावटी यांनी आपला रिपोर्ट बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय समितीकडे सोपवला. शरद पवार, शशांक मनोहर, चिरायू अमीन यांनी या प्रकरणी निकाल देताना त्याच्यावरील सिझन बॅन कायम ठेवला. पाच इंटरनॅशनल मॅचची बंदी घातली. वरून वॉर्निंग दिली की, पुन्हा असं काही घडल्यास लाईफ बॅन लावण्यात येईल.
इतक सगळं महाभारत घडलं, तरी श्रीसंत आणि हरभजन यांच्यातील संबंध बिघडले नाहीत. रागात चूक घडल्याने श्रीसंतनेही मोठ्या मनाने हरभजनला माफ केले. आता दोघेही इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर झालेत. तरीदेखील आयपीएलच्या या पहिल्या वादाची गुंज अजूनही ऐकू येतेच.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वृद्धिमान साहाचा मोठा निर्णय; म्हणाला, ‘आता मी त्यांच्यासोबत कधीच क्रिकेट खेळणार नाही’
‘मी फक्त एक प्रेक्षक होतो…’, डी कॉकची वादळी खेळी पाहून कर्णधार केएल राहुलने गायले गुणगान
क्षणाचाही विलंब न करता डी कॉकने घेतला केकेआरच्या खेळाडूचा अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हालाही फुटेल घाम