आयपीएल 2025 स्पर्धेतील 57 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने शानदार प्रदर्शन करत 2 विकेट्सने विजय प्राप्त केला. चेन्नईच्या या विजयामुळे केकेआरच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. आता त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उरलेले दोन्ही सामने तर जिंकावेच लागतील, त्याचबरोबर दुसऱ्या संघावर देखील अवलंबून राहावे लागेल. या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.
केकेआरने त्यांचा 12 वा सामना चेन्नई विरुद्ध खेळला. पण या पराभवानंतर केकेआरच्या पदरात निराशा पडली. सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर 6व्या स्थानावर आहे. केकेआरने आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 5 सामने जिंकले आहेत. केकेआरचे 12 गुण आहेत. जर केकेआरने उरलेले दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 15 गुण होतील.
15 गुणांसोबत प्लेऑफमध्ये पोहोचणे यावेळी कठीण आहे. कारण पॉईंट्स टेबलवर गुजरात 16 गुणांसह टॉपच्या स्थानावर आहे, तसेच आरसीबी सुद्धा 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 16 गुण असूनही दोन्ही संघानी आतापर्यंत क्वालिफाय केले नाही. चेन्नई, हैदराबाद आणि राजस्थान संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आधीच बंद झाला आहे.






