भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. त्याचबरोबर भारतीय संघाकडे ९ विकेट शिल्लक होत्या. पण शेवटच्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंड संघाला स्वतःवर पूर्ण विश्वास होता की ते शेवटच्या दिवशी हा सामना जिंकू शकतात. जर ट्रेंट ब्रिजमध्ये पाऊस पडला नसता तर इंग्लंडने भारताच्या राहिलेल्या सर्व नऊ विकेट्स घेतल्या असत्या असे त्याचे म्हणणे आहे.
इंग्लंडसाठी या सामन्यात कर्णदार रूटने दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले असतानाच, दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावून संघाला सामन्यात पुनरागमन करुन दिले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले आहे.
सामन्यानंतर रूटने कबूल केले की, शेवटच्या दिवशी भारताची विजयाकडे आगेकूच होती. तरीसुद्धा इंग्लंडच्या विजयाच्या अपेक्षा जिवंत होत्या असे त्याने सांगितले. याबद्दल तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, भारत सामन्याच्या शेवटच्या दिवशी आमच्यापेक्षा पुढे होता. तरीही आम्हाला माहित होते की, अशा खेळपट्टीवर तुम्ही कोणत्याही वेळी एक किंवा दोन विकेट घेऊन सामन्यात परत येऊ शकता.”
“एकवेळी असे वाटत होते की, पाचव्या दिवशी कमीत कमी ४० षटकांचा खेळ होऊ शकतो. त्यावेळी एक संघ म्हणून आम्ही विचार करत होतो की, जर खेळ झाला तर कदाचित आम्ही भारताच्या ९ खेळाडूंना बाद करण्यात यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे पाचव्या दिवशी आमच्या गोलंदाजीच्या दबावामुळे सामना आमच्या बाजूने वळला असता,” असेही तो म्हणाला.
त्याचबरोबर रूट पुढे म्हणाला की, “सामन्याच्या शेवटच्या दिवशी हवामानाने प्रत्येक गोष्टीवर वर्चस्व गाजवले आणि शेवटी तो जिंकला. आम्ही या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सरासरी फलंदाजी केली. पुढील कसोटीपूर्वी आम्हाला त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच आम्हाला संघाचे क्षेत्ररक्षण देखील सुधारावे लागणार आहे. पुढे ज्या काही संधी मिळतील त्याचा आम्ही नक्कीच फायदा घेऊ.”
भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ सोमवारी (०९ ऑगस्ट) दुसऱ्या कसोटीसाठी लंडनला रवाना होणार आहेत. तर मंगळवारपासून (१० ऑगस्ट) दोन्ही संघ लॉर्ड्स येथे प्रशिक्षण सुरू करू शकतात. या संघात दुसरा कसोटी सामना १२ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीमुळे माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले; ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे वक्तव्य
उर्वरित कसोटी मालिकेत कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन? कॅप्टन कोहलीने दिले उत्तर
विजयाची संधी हुकली तरीही कोहली अन् शास्त्री असतील खुश! कारणंही आहेत तितकीच समर्पक