---Advertisement---

ज्या क्रमांकाची जर्सी घातलो, तेवढेच लाख रोहितने दिले पंतप्रधान सहाय्यता निधीला

On: मंगळवार, मार्च 31, 2020 2:34 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे या व्हायरसला नष्ट करण्यासाठी जगभरातून मदतीचा हात येत आहे. अनेक दिग्गज खेळाडू, सेलिब्रिटींनी आपापल्या सरकारच्या मदत निधीमध्ये आणि सार्वजनिक चांगल्या कामांसाठी आपापल्या परीने मदत करण्यास सुरुवात केली आहे.

अशाच प्रकारे भारतातही अनेक दिग्गज व्यक्तींनी मागील काही दिवसांमध्ये आपल्या परीने मोठ-मोठी रक्कम सरकारी मदत निधीमध्ये जमा केली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी सोमवारी (३० मार्च) संयुक्तरित्या मदत करण्याची घोषणा केली होती. अहवालानुसार ही मदत अंदाजे ३ कोटी रुपये इतकी आहे.

विराट बरोबरच आता भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) मदत करण्याची घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत रोहितने मंगळवारी (३१ मार्च) ८० लाख रुपयांची मदत (Help of 80 Lakh Rupees) केली आहे. रोहित ४५ नंबरची जर्सी घालतो. त्याने या ८० लाखांतील बरोबर ४५ लाख हे पंतप्रधान मदत निधीला दिले आहेत.

यावेळी रोहितने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली. यावेळी रोहितने ट्वीट केले की, “आपल्याला आपला देश आपल्या पायावर हवा आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. मी ४५ लाख रुपये पंतप्रधान मदत निधीमध्ये आणि २५ लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ५ लाख रुपये कोरोना व्हायरसमुळे ज्या व्यक्तींचे जेवणांचे हाल होतात त्यांच्यासाठी आणि उर्वरित ५ लाख रुपये गल्लीतील कुत्र्यांच्या संगोपनासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.”

“चला आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांचे समर्थन करूया,” असेही रोहित यावेळी म्हणाला.

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत भारताच्या इतर खेळाडूंनीही मदत केली आहे. यामध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) ५० लाख रुपयांचे तांदुळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ५० लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच भारताची जागतिक बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने (P.V. Sindhu) १० लाख रुपयांचे योगदान दिले आहे.

कुस्तीपटू बजरंग पुनियाने हरियाणा मुख्यमंत्री मदत निधीमध्ये आपला ६ महिन्यांचा पगार दिला आहे. फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) आणि सध्या खासदार असणाऱ्या गौतम गंभीरने (Gautam Gambhir) अनुक्रमे ५२ आणि ५० लाख रुपयांचे योगदान दिले आहे.

धावपटू दुती चंद (Dutee Chand) आणि हिमा दास (Hima Das) यांनीही कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपला एक महिन्याचा पगार दिला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-अनेक शारिरिक कमी होत्या, तरीही हे ५ खेळाडू ठरले सर्वश्रेष्ठ

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे ५ खेळाडू

-क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारे ५ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---