भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी (७ मे) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी २० जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या काही क्रिकेटपटूंवर संघ निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे. यात अष्टपैलू हार्दिक पंड्या, फिरकीपटू कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज टी नटराजन यांचा समावेश आहे.
भारताला १८ ते २२ जून दरम्यान साऊथँम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर भारताला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे. या कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार असून १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
परंतु या मोठ्या दौऱ्यासाठी हार्दिक, कुलदीप, नटराजन यांसारख्या खेळाडूंना का निवडले गेले नसावे, हा प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात घोंगावत असेल. चला तर जाणून घेऊया, यामागील कारण…
१. भारताचा वेगवान गोलंदाज नटराजन याच्या गुडघ्याची नुकतीच सर्जरी झाली आहे. याच कारणामुळे तो आयपीएलच्या चौदाव्या हंगामात अवघे २ सामने खेळू शकला होता. याच कारणामुळे ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या नटराजनला कसोटी अजिंक्यपद आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात निवडण्यात आले नाही. नटराजनने आतापर्यंत भारताकडून केवळ १ कसोटी सामना खेळला आहे. यात त्याने ३ विकेट्सची कामगिरी केली होती.
२. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव यालाही भारतीय कसोटी संघात जागा देण्यात आली नाही. यामागचे कारण म्हणजे, त्याचा खराब फॉर्म असल्याचे सांगितले जात आहे. कुलदीपने फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. परंतु या सामन्यात तो केवळ २ विकेट्स घेऊ शकला होता. याबरोबरच आयपीएलच्या चौदाव्या हंगामातही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. याच कारणामुळे संघ निवडकर्त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केले असावे.
३. अष्टपैलू हार्दिक पंड्या अजूनही गोलंदाजीसाठी फिट असल्याचे दिसत नाही. त्याने मागील भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील अवघ्या एका सामन्यात गोलंदाजी केली होती. त्यातही तो विकेट घेण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे केवळ त्याची धुव्वादार फलंदाजी लक्षात न घेता एका अष्टपैलूच्या रुपात त्याच्या स्थानाचा विचार केला गेला. याच कारणामुळे त्याला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले. एवढेच नव्हे तर, त्याने २०१८ साली शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अर्थातच त्याला मागील ३ वर्षांपासून कसोटी क्रिकेटचा अनुभव नाही. त्यामुळेही कदाचित त्याच्यावर दुर्लक्ष केले गेले असावे.
महत्त्वाच्या बातम्या-
फॉर्मात असलेल्या पृथ्वीला भारतीय कसोटी संघात का मिळाली नाही संधी? प्रसिद्ध समालोचकाने सांगितले कारण
अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा कुटत आला प्रकाशझोतात, आता इंग्लंडमध्ये गरजणार ‘बंगालचा शेर’!