---Advertisement---

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली

On: सोमवार, जुलै 13, 2020 7:39 AM
---Advertisement---

-महेश वाघमारे

२०११ चा क्रिकेट विश्वचषक म्हणजे भारतीय क्रिकेटप्रेमी कधीही न विसरू शकणार असे स्वप्न आहे. तब्बल २८ वर्षानंतर भारताने विश्वचषक उंचावला होता. दरवेळी संभाव्य विजेत्या म्हणून दाखल होत असलेला भारत रिकाम्या हाती परतत असत. शेवटी घरच्या मैदानावर वर्ल्डकप उंचावून भारताने २८ वर्षाचा दुष्काळ एकदाचा संपवला होता.

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा हा अखेरचा वर्ल्डकप ठरणार होता. प्रत्येक भारतीयाला वाटत होते यावेळी मोका साधलाच पाहिजे. भारताने विश्वचषक जिंकावा म्हणून जागोजागी यज्ञ, पूजा, आरत्या चालू होत्या. ज्या ज्या शक्य होईल त्या त्या सर्व गोष्टी केल्या जात होत्या.

क्रिकेटचाहत्यांच्या सोबतच भारतीय संघातील खेळाडूसुद्धा “सचिनसाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे” याच ईर्षेने खेळत होते. कर्णधार धोनी, हरभजन, युवराज यांनी तर पणच केला होता काही झालं तरी लाडक्या सचिनला विश्वचषकाची भेट द्यायची. अनेक मुलाखतीत त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला होता.

विश्वचषकाला सुरुवात झाली‌. पहिल्याच सामन्यात बांगलादेशला मात देत भारताने अपेक्षित सुरुवात केली. पुढचा इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. साखळी सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली. पुढे, नेदरलँड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजला पराभूत करत भारताने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार होता. ऑस्ट्रेलियाने भक्कम धावसंख्या रचली. परंतु या भारतीय टीमला यावेळी कोणीही रोखू शकणार नव्हते. युवराज सिंग आणि सुरेश रैना च्या धुवाधार खेळयांनी भारताची उपांत्य फेरीतील सीट पक्की केली होती. उपांत्य फेरीत समोर असणार होते कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान..

भारताने पहिली फलंदाजी करत २६० धावा उभारल्या. सचिनने सर्वाधिक ८५ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघ २३० पर्यंत मजल मारू शकला. भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. वर्ल्डकप फक्त एक सामना आणि एक विजय दूर होता.

२ एप्रिल २०११

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान भारत आणि शेजारी श्रीलंका यातील अंतिम सामना. भारत आठ वर्षानंतर अंतिम सामना खेळत होता तर श्रीलंका २००७ नंतर सलग दुसरा.. भारत पूर्णपणे बंद होता.

वानखेडे स्टेडियम सकाळपासूनच भरू लागले होते.

दुपारी २ वाजता नाणेफेकीची वेळ आली. भारताचा कर्णधार एमएस धोनी आणि श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा वानखेडेच्या खेळपट्टीवर आले. सोबत, सामनाधिकारी जेफ क्रो आणि समालोचक रवी शास्त्री होते. धोनीने नाणे उडवले व संगकाराने कौल मागितला. संगकाराने मागितलेला कौल सामनाधिकारी क्रो यांना ऐकू गेला नव्हता. काही वेळ कोणालाच काही समजले नाही. पुन्हा दोन्ही कर्णधारांच्या सहमतीने दुसऱ्यांदा टॉस उडवण्यात आला आणि यावेळी मात्र तो श्रीलंकेच्या बाजूनी पडला. श्रीलंकेने पहिली फलंदाजी निवडली.

श्रीलंकेने टॉस जिंकताच प्रेक्षकांनी हुटिंग सुरू केले. इकडे, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये तर वेगळाच माहोल तयार झाला. अनेक भारतीय खेळाडू प्रचंड चिडले. आपापसात मोठ्याने चर्चा होऊ लागली. संगकाराच्या कृत्याला बेइमानी म्हटले गेले. ड्रेसिंगरूममधील वातावरण अचानक तणावपूर्ण झाले. धोनी ड्रेसिंग रूममध्ये परतला. त्याला झालेला प्रकार विचारल्यानंतर त्याने सांगितले,

” प्रेक्षकांच्या आवाजामुळे संगकाराचा कॉल रेफ्रीने ऐकला नाही.”

खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते. कोणी काही ना काही पुटपुटत होते. परिस्थिती ढासळू नये म्हणून अखेरीस सूत्रे सचिनने आपल्या हाती घेतले. सर्वांना मिटिंग रूममध्ये एकत्र करत त्याने बोलायला सुरुवात केली.

” हे पहा, झाली ती गोष्ट चुकीची झाली. टॉसचा इतका काही फरक पडत नाही. तुम्ही सगळे सर्वोत्कृष्ट खेळाडू आहात आणि आज वर्ल्डकप फायनल खेळताय. करोड भारतीयांचा विश्वास तुमच्यावर आहे त्यामुळे या गोष्टीला अजिबात महत्व देऊ नका. मैदानात उतरा, आपले १००% योगदान द्या आणि विश्वचषक जिंका.”

सचिनच्या त्या शब्दांनी खेळाडूंमध्ये उत्साह भरला आणि वातावरण एकदम पहिल्यासारखे हसत खेळत व तितकेच जोशपूर्ण झाले.

त्यानंतर भारताने 28 वर्षानंतर विश्वचषक आपल्या नावे केला होता. सचिनचे एकमेव अधुरे स्वप्न पूर्ण केले होते.

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स लेखमालेतील अन्य लेख-

-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली

–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ८: सायंकाळी द्रविडने प्रसादला फोन करत १५ वर्ष जुन्या पैजेची आठवण करून दिली

–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया

–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ६- २०१९ विश्वचषक उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये काय झाले?

–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले

–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ५- त्यादिवशी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये निवडणूक झाली

–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३:  दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला

–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना

–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---