टी२० मालिका ३-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघ (Indian Cricket Team) आता श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेच्या तयारीत आहे. या मालिकेनंतर संघ थेट जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यावेळी दक्षिण अफ्रिकेसोबत भारत मर्यादित षटकांची मालिका खेळेल. आगामी काळातील नियोजनता भारत आणि आयर्लंड यांचाही आमना-सामना (India vs Ireland Schedule) होणार आहे. आता क्रिकेट आयर्लंडने (Cricket Ireland) याविषयी अधिकृत तारखा जाहीर केल्या आहेत.
आयर्लंडविरुद्धची ही मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ विरोधी संघाच्या मायदेशात जाणार आहे. क्रिकेट आर्लंडने १ मार्चला त्यांच्या वार्षिक नियोजनाची अधिकृत माहिती सादर केली आहे. माहितीनुसार, भारतीय संघ जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे आणि त्याठिकाणी संघाला दोन टी२० सामने खेळायचे आहेत. हे सामने २६ आणि २८ जूनला मैलाहाइडमध्ये खेळले जातील. दरम्यान, भारतीय संघ चार वर्षांनंतर आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये टी२० मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ आयर्लंडमध्ये गेला होता आणि त्यावेळीही हे सामने मैलाहाइडमध्ये खेळले गेले होते.
आयर्लंडविरुद्ध ही टी२० मालिका खेळण्यापूर्वी भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यासाठी दक्षिण अफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि हे सामने ९ ते १५ जूनदरम्यान खेळले जाणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ आयर्लंडसाठी रवाना होईल. असे असले तरी, पाहण्यासारखी गोष्ट ही असेल की, बीसीसीआय आयर्लंड दौऱ्यावर कोणत्या खेळाडूंना पाठवते. कारण, आयपीएल २०२२ हंगामानंतर भारतीय संघाला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळावी लागणार आहे. अशात आयर्लंड दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देऊन वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
दरम्यान, या उन्हाळ्यात आयर्लंड संघ भारतीय संघाव्यतिरिक्त न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रेकविरुद्धच्या मालिकांमध्येही यजमानपद भूषवणार आहे. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आयर्लंड संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळणार आहे. यानंतर आयर्लंडला मायदेशात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची टी२० मालिकाही खेळायची आहे. त्याव्यतिरिक्त आयर्लंडला अफगाणिस्तान सोबतही मालिका खेळायची आहे. मात्र, याचे वेळापत्रक अद्याप घोषित केले गेले नाहीये.
महत्वाच्या बातम्या –
नादच खुळा! रोहित शर्माने खरेदी केली लग्झरी कार, किंमत ऐकून पायाखालची सरकेल जमीन