भारतीयांचे सर्वाधिक मनोरंजन करणाऱ्या दोन गोष्टी कोणत्या? असा प्रश्न विचारला तर नक्कीच त्याचे बहुमताने जे उत्तर येईल ते म्हणजे क्रिकेट आणि सिनेमा होय. याचे महत्वाचे कारण स्वातंत्र्यानंतरच्या काळात तमाम भारतीयांना सिनेमा आणि क्रिकेटने भरपूर स्वप्ने दाखवली. लहानपणापासूनच अनेक मुले-मुली एकतर चित्रपटाचा नायक-नायिका होण्याचे, नाहीतर क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहत असतात.
बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नाते तसे खुप जुने आहे. अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींसोबत लग्न केले. तर, अनेक अभिनेत्र्यांचे प्रियकर हे क्रिकेटपटू राहिले आहेत. सर गॅरी सोबर्स-अंजू महेंद्रू यांपासून ते सध्या केएल राहुल-अथिया शेट्टी अशी ही बरीच लांबलचक यादी आहे.
अमिताभ बच्चन एक दर्दी क्रिकेटप्रेमी…
सत्तर ते ऐंशीच्या दशकात भारतीय सिनेमाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून अमिताभ बच्चन यांना ओळखले जाते. तसेच त्यांना शतकातील महानायक असेही म्हटले जाते. भारतीय सिनेमाचा एवढा मोठा कलाकार आणि त्यांच्या क्रिकेटशी संबंध नाही, असं कसं शक्य आहे. खरे तर अमिताभ बच्चन हे अतिशय दर्दी असे क्रिकेटप्रेमी आहे. अमिताभ बच्चन यांचा आज (११ ऑक्टोबर) ८० वा वाढदिवस आहे. त्यामुळेच आजच्या लेखात आपण महानायक अमिताभ बच्चन आणि क्रिकेट यांच्यातील नाते उगडणार आहोत.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट आणि क्रिकेट…
अमिताभ बच्चन यांचा १९७७ साली ‘अमर अकबर अँथनी’ नावाचा एक सुपरहिट चित्रपट आला होता. या चित्रपटात जेव्हा अमर नावाचे पात्र साकारणारे विनोद खन्ना, खलनायक रॉबर्टविषयी अमिताभ यांना विचारतात,
“रॉबर्ट कहा है?”
तेव्हा अँथनीची भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन त्यांना उत्तर देतात,
” रॉबर्ट? कौन रॉबर्ट? वो वेस्टइंडीज का फास्ट बॉलर अँडी रॉबर्ट? वह तो चला गया? मेरे से मिलके भी नही गया।
भारतीय सिनेमाचे ‘शोमॅन’ म्हणून ओळखले जाणाऱ्या राजकपूर यांच्या स्मरणार्थ १९९० पासून फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. या पहिल्याच पुरस्काराचे मानकरी अर्थातच अमिताभ बच्चन हेच होते. हा पुरस्कार अमिताभजींना त्यावेळचे भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव असलेल्या सुनील गावसकर यांच्या हस्ते देण्यात आला होता.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ऑस्करपर्यंत जाणाऱ्या क्रिकेटवर आधारित ‘लगान’ चित्रपटातील निवेदन देखील पडद्यामागून अमिताभ यांनीच केले होते.
विश्वविजेता भारत आणि आनंदोत्सवात न्हावून निघाले अमिताभजी…
भारतीय संघाने २०११ साली क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर एक सच्चा क्रिकेटप्रेमी असलेले अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांनी सुरक्षेची तमा न बाळगता रस्त्यावर येऊन लोकांसमवेत आनंद साजरा केला होता.
अमिताभ बच्चन हे नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून क्रिकेटविषयी आपली मते व्यक्त करत असतात. कोणत्याही युवा खेळाडूने उत्तम कामगिरी केली असता, त्याचे अभिनंदन करायला अमिताभजी बिलकुल मागे राहत नाहीत. २०१८ साली जेव्हा भारताच्या दृष्टिहीन खेळाडूंच्या संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, तेव्हा त्या संघाचे अभिनंदन करणारे पहिले व्यक्ती हे अमिताभ बच्चन होते.
क्रिकेट समालोचकाच्या भुमिकेत अमिताभ बच्चन….
जगातील भारदस्त आवाजांपैकी एक आवाज लाभलेल्या अमितजींनी २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान क्रिकेट समालोचन क्षेत्रात देखील पदार्पण केले. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यावेळी अरुण लाल आणि शोएब अख्तर यांच्यासमवेत त्यांनी समालोचन केले होते. त्यानंतरही ते अनेक वेळा समालोचन करताना दिसून आले. एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, “राहुल द्रविड आणि कपिल देव यांच्यासमवेत समालोचन करत असताना मला गौरवान्वित झाल्यासारखे वाटले.”
भारतात आयोजित २०१६ सालच्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकावेळी ‘ईडन गार्डन’ मैदानावर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अमिताभ बच्चन यांना आमंत्रित केले होते. सौरव गांगुलीच्या आमंत्रणाचा मान राखत, अमिताभ बच्चन त्या ठिकाणी पोहोचले होते. तो सामना सुरू होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत देखील अमिताभजी यांनीच गायले होते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांचे जिव्हाळ्याचे संबंध…
अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दोघेही आपापल्या क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्ती असल्याने, त्यांचा ऋणानुबंध खुप जुना आहे. सचिन तेंडूलकरचा आत्मचरित्रपर चित्रपट “सचिन : ए बिलियन ड्रीम्स” हा ज्यावेळी प्रदर्शित होणार होता, त्यावेळी सचिनने चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सर्वात प्रथम अमिताभ बच्चन यांना आमंत्रित केले होते.
एका मुलाखतीत सचिनने, अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा एक गमतीशीर किस्सा सांगताना म्हटले, “आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी एका जाहिरातीत काम केले होते. त्यावेळी माझा मुलगा अर्जुन खूप लहान होता. मी त्याला घेऊन शूटिंगसाठी आलो होतो. माझे शुटिंग सुरू असताना अमिताभजी अर्जुनला मांडीवर घेऊन खेळवत होते. सोबतच अर्जुन संत्रे खात होता. त्याने खाता खाता आपले हात अमिताभजींच्या कुर्त्यावर पुसले आणि तो कुर्ता खराब झाला. मात्र, त्यांनी एखाद्या नातवाप्रमाणे त्याच्याशी खेळणे सुरूच ठेवले.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बड्डे स्पेशल: …आणि हार्दिक पंड्याने सचिनची भविष्यवाणी खरी करुन दाखवली
गोलंदाजांनो अश्विन काय म्हणतोय बघा! ऑस्ट्रेलियात टिकायचं असेल, तर ‘अशी’ करा गोलंदाजी