आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वेगवान गोलंदाज निर्माण करणाऱ्या देशांपैकी एक देश म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकाहून एक सरस वेगवान गोलंदाजांनी आपल्या तुफानी वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या काळजात धडकी भरवली होती. चार्ली टर्नर, डेनिस लिली, जेफ थॉम्पसन यांच्यापासून सुरू झालेली वेगवान गोलंदाजीची परंपरा ग्लेन मॅकग्रा, क्रेग मॅकडरमॉट, जेसन गिलेस्पी, ब्रेट ली यांनी पुढे नेली. मिचेल जॉन्सन, शॉन टेट यांनी अस्सल वेगवान गोलंदाजीचे उत्तम प्रात्यक्षिक दाखवले. सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघात मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड हे उच्चप्रतीचे वेगवान गोलंदाज आहेत. या सर्वांसोबतच ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघामध्ये एक वेगवान गोलंदाज या तिकडीला साथ देतो. तो वेगवान गोलंदाज म्हणजे नॅथन कुल्टर-नाईल.
क्रिकेट खेळण्याची सुरुवात
तीन भावांमध्ये मोठा असलेल्या नॅथनच्या घरात यापूर्वी कुणीही क्रिकेटर नव्हते. २००३-२००४ च्या हंगामात फ्रीमॅटल जिल्हा संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याची निवड वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या सतरा वर्षाखालील संघात झाली. त्यावर्षीच्या १७ वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याला जास्त बळी मिळविण्यात अपयश आले. मात्र, नॅथन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित सदस्य बनला.
दोन वर्षानंतर, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडूनच त्याने १९ वर्षाखालील मुलांची स्पर्धा खेळली. त्याने सहा सामन्यात ८ बळी मिळवले. त्याच्या वेगाने प्रभावित होऊन, दिग्गज वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांनी त्याला आपल्या अकादमीत प्रवेश दिला. त्याच वर्षी तो ऑस्ट्रेलियाच्या एकोणीस वर्षाखालील संघाचा सदस्यदेखील झाला.
कुल्टर-नाईल जेव्हा एकदम तरुण होता तेव्हा म्हणजे, २००७-२०११ या दरम्यान ऑस्ट्रेलियन संघात ब्रेट ली, मॅकग्रा, टेट, जॉन्सन यांच्यासारखे वेगवान गोलंदाज होते. त्यामुळे कुल्टर-नाईलला संधी मिळत नव्हती. राष्ट्रीय संघात संधी मिळत नसली तरीही, तो वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. २०१२-१३ चा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्याचा सन्मान देखील झाला.
…अखेरीस प्रतीक्षा संपली आणि राष्ट्रीय संघात निवड झाली
कुल्टर-नाईल २०११ पासून सातत्याने ऑस्ट्रेलिया अ संघात होता. मात्र, त्याला पदार्पणाची संधी मिळत नव्हती. फेब्रुवारी २०१३ मध्ये, शेफील्ड शील्ड सामन्यात क्वींसलंडविरुद्ध नऊ बळी मिळविल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचे दोन माजी खेळाडू माइक हसी व शेन वॉर्न यांनी, कुल्टर-नाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.
जवळपास सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कुल्टर-नाईलला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या टी२० सामन्यात त्याने एक बळी मिळवला तसेच आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत आक्रमक १६ धावा फटकावल्या. इंग्लंडमध्ये आयोजित २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला. २०१३ च्या भारत दौऱ्यात त्याने, गोलंदाज तसेच फलंदाज म्हणून देखील उपयोगी कामगिरी केली. वेगवान गोलंदाजाच्या जागेसाठी प्रचंड स्पर्धा असल्याने कुल्टर-नाईल ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात नियमित जागा बनवू शकत नव्हता. मात्र, टी२० संघाचा तो प्रमुख वेगवान गोलंदाज बनला. २०१६ टी२० विश्वचषकात तो ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.
कुल्टर-नाईलची कारकीर्द ही दुखापतींनी भरलेली आहे. तो वारंवार दुखापतग्रस्त होत राहतो. २०१८ या वर्षात सलगपणे दुखापतींनी त्रस्त राहिल्यानंतर, त्याने २०१९ क्रिकेट विश्वचषकातद्वारे पुनरागमन केले. या स्पर्धेत खऱ्या अर्थाने त्याचा अष्टपैलू खेळ सर्वांना पाहायला मिळाला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने, ९२ धावांची मॅच विनिंग खेळी केली.
आयपीएलचा ‘मिलेनियर’
कुल्टर-नाईल हा टी२० चा उत्कृष्ट गोलंदाज असल्याने, त्याला आयपीएलमध्ये प्रचंड मागणी असते. २०१३ च्या आयपीएल लिलावात प्रथमच सहभागी होत झालेल्या कुल्टर-नाईलला आपल्या संघात घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्समध्ये जोरदार रस्सीखेच झाली. मुंबईने २ कोटी २० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केले. त्या वर्षी त्याला अवघा एक सामना खेळण्याची संधी मिळाली. पुढील वर्षी पुन्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला करोडपती बनवले. यावेळी त्याला ४.२५ कोटी रुपये देण्यात आले होते. त्यावर्षी त्याने दिल्लीकडून सर्वाधिक १५ बळी मिळवले. २०१७ आयपीएल लिलावात केकेआरने त्याच्यासाठी ३.५० कोटी रुपये मोजले. २०१७ चा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम ठरला. या हंगामात त्याने, ८.१० च्या इकॉनॉमी रेटने १५ गडी गारद केले. पुढच्या वर्षी पुन्हा तो २.२० कोटी रुपये घेऊन आरसीबीच्या ताफ्यात दाखल झाला. मात्र, दुखापतीमुळे तो सलग दोन हंगाम खेळू शकला नाही. २०२० आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने तब्बल ८ कोटी रुपयांची घसघशीत रक्कम त्याला दिली आहे.
कायम दुखापतग्रस्त असला तरी, टी२० चा उपयुक्त गोलंदाज म्हणून कुल्टर-नाईलला कायमच राष्ट्रीय संघ तसेच व्यवसायिक लीगमध्ये मॅचविनर गोलंदाज मानले जाते.
वाचा-
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई