---Advertisement---

शतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूला ‘त्यांनी’ चक्क घेतले होते उचलून

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2020 3:44 PM
---Advertisement---

वर्ष १९७३. इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. तिसरी कसोटी मद्रासमध्ये होणार होती. पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर मालिका १-१ ने बरोबरीत होती. जेव्हा मद्रास कसोटी चौथ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात पोहोचली होती  तेव्हा माईक डेनिस ८६ धावांची खेळी करून परतले होते आणि त्याच बरोबर इंग्लंडचा दुसरा डावही संपुष्टात आला होता. भारताला विजयासाठी केवळ ७६ धावांचे लक्ष्य मिळाले. सलामीवीर फारूक इंजिनियर लवकर परतल्याने अजित वाडेकर मैदानात उतरले. सुरुवातीलाच वाडेकर यांच्या बॅटची कड घेत बॉल पहिल्या स्लिपमध्ये पोहोचला. तिथे उभे असलेल्या टोनी ग्रेग यांनी तो झेल घेतला. सर्व काही इतक्या लवकर घडले की, झेल योग्यरीत्या घेतला गेला आहे की नाही याबद्दल, वाडेकर यांना खात्री नव्हती. टोनी ग्रेग आणि इतर इंग्लिश खेळाडूंनी जोरदार अपील केले. कर्णधार ग्रेग यांना कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायचा आहे, हे वाडेकरांना ठाऊक होते आणि म्हणून ते पंचांनी निर्णय येईपर्यंत ते वाट पाहत राहिले.

त्या सामन्यात अहमद मम्सा पंच होते. त्यांनी वाडेकरांना नाबाद ठरवले आणि त्यानंतर टोनी ग्रेग ज्यासाठी ओळखले जात असे तीच गोष्ट त्यांनी केली. ते झपझप पंचांपर्यंत गेले. ग्रेग इतके वैतागले होते की, त्यांच्या तोंडून आपोआप हिंदीतील चार-पाच अक्षरी शिव्या बाहेर येऊ लागल्या. यष्टीरक्षक ऍलन नॉट यांनी ग्लोव्हज टाकून दिले. तोपर्यंत इतर इंग्लिश खेळाडू देखील पंचांकडे धावून गेले. त्यानंतर मम्सा यांनी स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या पंचांना गाठले. दुसर्‍या पंचांनी झेल स्पष्टपणे पाहिला होता. दोन्ही पंचांनी चर्चा करून वाडेकर यांना बाद ठरवले. ग्रेग यांचा आक्रमक स्वभाव कामी आला. पुढे, सलीम दुराणी यांनी षटकार मारत भारताला हा सामना जिंकून दिला. मात्र, ग्रेग यांनी दिलेल्या हिंदी शिव्यांची बातमी चांगलीच गाजली.

ग्रेग आणि वाद समीकरण तसे कायम जोडले गेले होते. अल्विन कालिचरण यांना दिवसातील अखेरच्या चेंडूवर धावबाद करण्याचा वाद असो नाहीतर, वेस्टइंडीज विरुद्धच अनावधानाने वर्णभेदी टिप्पणी केल्याचा आरोप असो. ही सर्व प्रकरणे कायम त्यांच्या नावापुढे लागली. वर्णभेदी टिप्पणीचा आरोप लागल्यानंतर, गुडघ्यावर बसून त्यांनी वेस्टइंडीजच्या खेळाडूंची माफी मागत, तमाम क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली होती.

ग्रेग भारतीय क्रिकेट चाहत्यांचेही अत्यंत आवडते खेळाडू होते. मैदानावर कायम ते चेष्टा मस्करी करत असत. कधी हात जोडत, कधी उगीचच वेडेवाकडे अंगविक्षेप करत. एकदा तर, कोलकाता येथे खेळत असताना त्यांनी आपली पॅन्ट खाली घेतली. ग्रेग यांचे व्यक्तिमत्त्व असे होते की, कोणीही त्यांच्या प्रेमात पडावे. आज भारतात एबी डिविलियर्स, ख्रिस गेल, राशीद खान यांना ज्याप्रकारे प्रेम मिळते, त्याप्रकारचे प्रेम प्रथमता ग्रेग यांना मिळाले होते.

१९७३ मालिकेतीलच, मुंबईच्या अखेरच्या कसोटीत गुंडाप्पा विश्वनाथ व सलीम दुराणी यांच्यात चांगली भागिदारी झाली. विश्वनाथ यांनी शतक साजरे केले. विश्वनाथ यांनी शतक करताच सहा फूट सहा इंच उंचीचे ग्रेग धावत विश्वनाथ यांच्याकडे गेले आणि विश्वनाथ यांना लहान मुलाप्रमाणे उचलून घेतले. विश्वनाथ यांचे अभिनंदन करायची ही पद्धत सर्वांनाच खूप आवडली. सर्व प्रेक्षकांनी ग्रेग यांच्या कृतीला टाळ्यांनी दाद दिली.

ग्रेग यांनी १४ कसोटीत इंग्लंडचे नेतृत्व केले. त्यात ३ विजय व ५ पराभव अशी त्यांची कामगिरी राहिली. या चौदापैकी पाच सामने वेस्ट इंडिज विरुद्धच्या त्या वादग्रस्त मालिकेतील देखील होते. सर इयान बोथम व अॅण्ड्रू फ्लिंटॉफ यांच्या बरोबरीचे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची इंग्लिश क्रिकेटमध्ये नोंद आहे.

९ मे १९७७ चा दिवस असा होता, ज्या दिवशी इंग्लंड क्रिकेटचे नायक असलेले ग्रेग खलनायक ठरले होते. या दिवशी पहिल्यांदा कॅरी पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटची बातमी फुटली. इंग्लंड बोर्डाने टोनी ग्रेग यांना ताबडतोब कर्णधारपदावरून काढून टाकले. कारण, या षडयंत्रामागील ‘मास्टरमाइंड’ ग्रेग यांना ठरवले गेले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बडतर्फ करण्यात आले.

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ही, क्रिकेट चाहते त्यांना विसरले नाहीत. १९७० नंतर जन्मलेल्या क्रिकेटप्रेमींसाठी ग्रेग यांचा आवाज म्हणजे क्रिकेटची ओळख होती. बिल लॉरी, रिची बेनो यांच्यासारख्या समालोचकांसोबत त्यांचे विशेष सुत जुळले. सचिन तेंडुलकरने शारजामध्ये केलेले ‘सॅन्ड स्टॉर्म’ नंतरचे शतक हे सचिन इतकेच टोनी ग्रेग यांच्या समालोचनासाठीदेखील प्रसिद्ध आहे. सचिनने षटकार मारत असताना ग्रेग यांनी उच्चारलेले,

“They are dancing in the aislen in Sharjah” हे शब्द क्रिकेटप्रेमींसाठी एखाद्या म्हणीप्रमाणे आहेत.

ग्रेग अत्यंत मनमौजी प्रकारचे व्यक्तिमत्त्व होते. उंचेपुरे, धडधाकट ग्रेग समालोचन करत असताना, कोणालाही कंटाळा येत नसे. हलके फुलके विनोद तसेच आपल्या जोशपूर्ण आवाजात क्रिकेटची इत्थंभूत माहिती ते क्रिकेट रसिकांना देत. ग्रेग हे असे खेळाडू होते ज्यांनी, भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंकडून हिंदी शिव्या शिकत आपल्या संघातील खेळाडूंनी चूक केल्यास त्यांना त्या शिव्या हासडत. एक आक्रमक, वादग्रस्त पण तितकेच मनमिळावू व युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणारे खेळाडू म्हणून आजही ग्रेग यांना ओळखले जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---