मैदान कोणत्याही खेळाचे असो, त्यावर खेळाडूंव्यतिरिक्त एक व्यक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण असते ती म्हणजे पंच. सामन्याचे संचालन योग्यरितीने व नियमाला धरुन करण्याची जबाबदारी पंचांची असते. खेळाडूंच्या चूका तिथल्या तिथे दाखवून, खेळाला गालबोट न लागण्यासाठी पंच कार्यरत असतात. मात्र, अनेकदा अशा घटना घडतात, ज्यावेळी या पंचांचे निर्णय हे विवादास्पद असतात. काही पंच एकाच संघाला लक्ष करून त्यांच्या विरोधात निर्णय देतात. क्रिकेटच्या इतिहासात देखील असे काही पंच होऊन गेले, जे आपल्या संपूर्ण कारकीर्दीत फक्त वादग्रस्त निर्णयासाठी लक्षात ठेवले जातात. त्यापैकीच एक नाव म्हणजे डॅरेल हार्पर. डॅरेल हार्पर आणि आणि चुकीचे निर्णय हे अनेकदा समीकरणच होऊन बसले होते. या महाशयांनी, सचिन तेंडूलकरला खांद्यावर चेंडू लागला असतानाही, पायचीत देण्याचा कारनामा केला होता. हार्पर यांच्या अशाच एका वादग्रस्त नाही, मात्र मजेशीर किश्श्याची आठवण आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.
शारजातील कोकाकोला कप
सन २००० मध्ये शारजात भारत-श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यादरम्यान ‘कोकाकोला चॅम्पियन्स ट्रॉफी’ नावाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात, श्रीलंकेने भारताचा पाच गडी राखून सहज पराभव केला. दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेने, झिम्बाब्वेला पछाडत, स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे एक पाऊल टाकले. २२ ऑक्टोबर रोजी भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण सामना होणार होता.
त्यावेळी झिम्बाब्वेचा संघ आत्तासारखा कमकुवत नव्हता. झिम्बाब्वेने १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीपर्यंत धडक मारलेली. भारत या स्पर्धेत आपला सर्वोत्कृष्ट फिरकीपटू अनिल कुंबळेच्या अनुपस्थित खेळणार होता. एकूणच, झिम्बाब्वेला या सामन्यात विजयाची सर्वाधिक संधी होती.
https://twitter.com/mohsinstats/status/1054368330667028483
ट्रेविड फ्रेंडने उडवली भारतीय फलंदाजांचे दाणादाण
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात राहुल द्रविडला प्रथमच सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली. डावाच्या सुरुवातीलाच सचिनला गे विटालने एक सोपे जीवदान दिले. त्यानंतर सचिनने चौकार मारला. पण, लगेचच हिथ स्ट्रिकने त्याला यष्टीरक्षक अॅण्डी फ्लॉवरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. द्रविडने विनोद कांबळीसोबत जोडी जमवत, डाव सुरू ठेवला. इतक्यात हिथ स्ट्रिकच्या बाजूने, ट्रेविस फ्रेंड गोलंदाजी करायला आला. त्याने कांबळीला बाउन्सर टाकून हैराण केले. एक चेंडू त्याच्या हेल्मेटवर तर एक खांद्यावर चांगला जोरात लागला. अखेरीस, कांबळीने वैयक्तिक १८ धावा करून, पव्हेलियनची वाट धरली. त्याच्या जागी आलेल्या, कर्णधार गांगुलीने एक-दोन चांगले फटके मारले. फ्रेंडनेच गांगुलीला बाद करत, भारताची अवस्था तीन बाद ९३ अशी केली.
द्रविड-युवराजची भागीदारी
भरवशाचे व अनुभवी फलंदाज परतल्यानंतरही राहुल द्रविड मैदानावर तळ ठोकून होता. त्याने फिरकीपटू डर्क विलजोनला चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघात नव्याने दाखल झालेल्या तरण्या युवराजसिंगला साथीला घेत त्याने भारताचा डाव सावरला सुरुवात केली. दोघांचाही चांगला जम बसलेला दिसत होता.
द्रविड आणि यांनी ५४ धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. युवराज जबाबदारीने खेळत ३८ चेंडूत ३४ धावांपर्यंत पोहोचला होता. ही भागीदारी झिम्बाब्वेला डोईजड होऊ लागल्याने, कर्णधार हिथ स्ट्रिकने चेंडू पुन्हा फ्रेंडच्या हाती सोपविला.
हार्पर यांनी केली घाई; यष्टी उडवलेल्या चेंडूला दिले वाईड
फ्रेंडने ३३ व्या षटकातील चौथा चेंडू टाकला आणि.. चेंडू युवराजच्या अंगामागून जात सरळ यष्टीरक्षक अॅण्डी फ्लॉवरच्या हाती गेला. पंच असलेल्या, डॅरेल हार्पर यांनी तात्काळ ‘वाईड बॉल’ अशी खूण केली. मात्र, हा वाईड बॉल नव्हता. कारण, चेंडू जाताना हलकासा, यष्ट्यांवर लागला आणि बेल्स खाली पडल्या. काय झाले हे, झिम्बाब्वेच्या खेळाडूंच्याही लक्षात आले नाही.
सुदैवाने, स्क्वेअर लेगला पंच म्हणून अनुभवी स्टीव डून उभे होते. त्यावेळी, डेविड शेफर्ड व स्टीव रॅन्डेल यांच्यानंतर त्यांनाच सर्वाधिक सामन्यात पंच म्हणून उभे राहण्याचा अनुभव होता. डून यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यांनी हार्पर यांना बेल्स पडल्याचे निदर्शनास आणून दिले. हार्पर यांनीदेखील हसत-हसत आपला निर्णय बदलला आणि युवराजला बाद दिले.
झहीर खानने मिळवून दिला भारताला पहिला विजय
पुढे, द्रविडही ८५ धावा काढून तंबूत परतला. विजय दहिया आणि सुनील जोशी यांनी थोडाफार हातभार लावल्याने, भारताने २६५ धावांची समाधानकारक धावसंख्या उभारली. झिम्बाब्वेकडून ट्रेविस फ्रेंडने सर्वधिक चार बळी मिळवले.
भारताने दिलेल्या २६६ धावांचा पाठलाग करताना, झिम्बाब्वेचे प्रयत्न १३ धावांनी कमी पडले. कॅर्सालिस व अॅण्डी फ्लॉवर यांच्या अर्धशतकानंतर सामन्यात रंगत आली होती. गे विटाल यांनीदेखील अखेरपर्यंत, प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये झहीर खान, व्यंकटेश प्रसाद आणि अजित आगरकरने नियंत्रित मारा करत झिम्बाब्वेला विजय मिळवण्यापासून रोखले. युवा झहीरने तीन फलंदाजांना माघारी धाडत, सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
एकतर्फी अंतिम सामना
स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान झाला. मात्र, अंतिम सामना अजिबात रंगला नाही. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना, जयसूर्याच्या १८९ व रसेल अरनोल्डच्या ५२ धावांच्या बळावर २९९ धावा केल्या. भारताला ३०० धावांचे आव्हान पेलवलेच नाही. चामिंडा वासने १४ धावांत ५ आणि मुरलीधरनने ६ धावांत ३ बळी मिळवत, भारताचा ५४ धावांत खुर्दा उडवला. भारताकडून एकटा रॉबिन सिंग दुहेरी धावसंख्या गाठू शकला. त्याने, ११ धावा काढल्या.
कोकाकोला चॅम्पियन्स ट्रॉफी ही आजही एकतर्फी अंतिम सामन्यासाठी व हार्पर यांच्या ‘त्या’ नसलेल्या वाईड बॉलसाठी ओळखली जाते.