काल आयपीएलच्या तेराव्या हंगामाला यूएईमध्ये धमाकेदार सुरुवात झाले. आयपीएलचे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यादरम्यान झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला पाच गड्यांनी पराभूत करत विजयी प्रारंभ केला. हरभजन सिंग, सुरेश रैना व ड्वेन ब्राव्हो या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही चेन्नईने मिळवलेला हा विजय इतर संघांसाठी धोक्याची सूचना आहे.
पहिल्या सामन्यात चेन्नईने सांघिक कामगिरीच्या बळावर जरी विजय मिळवला असला तरी, इंग्लंडच्या सॅम करनने गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात जबरदस्त प्रदर्शन करून सर्वांची वाहवा मिळवली. चेन्नईसाठी आपला पहिला सामना खेळत असलेल्या करनने ब्राव्होची अनुपस्थिती सीएसकेला अजिबात जाणवू दिली नाही. याच सॅम करनविषयी आज जाणून घेऊया.
सॅमचे वडील केविन करन हे झिम्बाब्वेचे माजी राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. केविन यांनी १९८३ व १९८७ विश्वचषकात झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केलेले. इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यानंतरही ते २००५-२००७ या काळात झिम्बाब्वेचे राष्ट्रीय प्रशिक्षक होते. सॅम हा केविन यांचा तृतीय चिरंजीव. सॅमचा मोठा भाऊ टॉम हा २०१७ पासून इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग आहे. २०१९ क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या इंग्लंड संघाचा तो सदस्य होता. दुसरा भाऊ बेन हादेखील नॉर्थम्पटनशायर काउंटी संघाचा प्रमुख खेळाडू आहे.
घरातच क्रिकेटचे बाळकडू मिळालेले असल्याने सॅमला क्रिकेटमध्ये पारंगत होण्यास वेळ लागला नाही. अॅलेक स्टीवर्ट सरेचे संचालक असताना, त्यांनी सॅमचा सरेच्या १५ वर्षाखालील संघात समावेश केला होता. सरेच्या १५ व १७ वर्षाखालील संघासाठी धडाकेबाज कामगिरी करत त्याने १७ व्या वर्षी सरेच्या वरिष्ठ संघात जागा मिळवली. केंटविरुद्ध १७ धावांत ५ बळी मिळवताना, काउंटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वात कमी वयात बळींचे पंचक मिळवणारा गोलंदाज म्हणून त्याची नोंद झाली.
काउंटी व नेटवेस्ट ब्लास्ट टी२० स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर त्याची निवड २०१६ च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी, इंग्लंडच्या संघात करण्यात आली. त्या स्पर्धेत देखील २०१ धावा व ७ बळी अशी कामगिरी करत त्याने आपली उपयोगिता सिद्ध केली.
२०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बेन स्टोक्सचा पर्यायी खेळाडू म्हणून, सॅमला निवडले गेले. त्याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी तर पंधरा दिवसाच्या अंतरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत २७२ धावा व ११ बळी मिळवत त्याने मालिकावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला. सॅम इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये लकी चार्म ठरला आहे. तो खेळलेल्या १९ कसोटीत एकदाही इंग्लंडला पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असताना, २०१९ च्या आयपीएल लिलावात, ७ कोटी २० लाखांची तगडी बोली लावत, किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या संघात सामील केले. त्या हंगामात, केकेआर विरुद्ध सलामीला येऊन २३ चेंडूत ५५ धावा करून आपले फलंदाजी कौशल्य त्याने सर्वांना दाखवले. दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध हॅट्रिक घेत, आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात हॅट्रिक घेणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला.
२०२० आयपीएलपूर्वी पंजाबने त्याला करारमुक्त केल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जने ५ कोटी ५० लाखांची बोली या अष्टपैलू खेळाडूवर लावत, त्याला खरेदी केले. काल, आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यात, एका दिवसापूर्वीच युएईत दाखल झालेल्या सॅमला, अचानकपणे संधी मिळाल्यानंतर, प्रथमता गोलंदाजी करत २८ धावांत एक बळी, क्षेत्ररक्षणात दोन झेल व धावांचा पाठलाग करताना, विजयासाठी १७ चेंडूत २७ धावांची गरज असताना ६ चेंडूत दोन षटकार व एका चौकारांसह १८ धावा काढत, संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले. पहिल्या सामन्यातील दमदार कामगिरीने त्याने, आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.
सॅमच्या कालच्या कामगिरीने, सीएसकेचे चाहते त्याची तुलना, सीएसकेसाठी खेळलेला माजी द. आफ्रिकन अष्टपैलू खेळाडू ऍल्बी मॉर्केल याच्याशी करत आहेत. चेन्नईच्या संघातील बहुतांशी खेळाडू पस्तिशी पार करून गेले असल्याने, चेन्नईसाठी भविष्यातील एक मोठा खेळाडू म्हणून सॅममध्ये सीएसके व्यवस्थापन गुंतवणूक करू शकते.
वाचा-
-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान
-सौरभ तिवारी आणि मुंबई इंडियन्स ‘ये रिश्ता कुछ तो कहलाता है’
-मुंबई इंडियन्सच्या फिरकी आक्रमणाचा नवा स्तंभ